साहस्रधारा नदी परिसरात भीषण पूरस्थिती
मसुरी, मालदेवता व इतर भागांत मोठे नुकसान
‘एसडीआरएफ’-‘एनडीआरएफ’ पथके तैनात
मुख्यमंत्री धामींचे मदत कार्याला गती देण्याचे आदेश
डेहराडून : सोमवारी रात्री उशिरा झालेल्या ढगफुटीमुळे डेहराडून जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली. साहस्रधारा नदीच्या भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होऊन मंगळवारी पहाटे आलेल्या पुराच्या लाटांमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून, 8 जण बेपत्ता आहेत. हॉटेल्स, दुकाने आणि घरे वाहून गेली असून, अनेक व्यावसायिक आस्थापना व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
मालदेवता, टपकेश्वर व मसुरी परिसरातही मोठे नुकसान झाले आहे. मसुरीतील झरीपाणी टोल प्लाझावर दरड कोसळून दोन कामगार गाडले गेले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. परवाल गावाजवळ 8 मजूर आसन नदीत वाहून गेले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी रात्रीतून बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत 300 ते 400 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. डोईवाला, मोहिनी रोड, भगतसिंग कॉलनीसह अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने लोक अडचणीत आले. देवभूमी इन्स्टिट्यूटच्या परिसरात पाण्यात अडकलेल्या 200 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.