Dharali Cloudburst ISRO Images
देहरादून : उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली गावात 5 ऑगस्ट रोजी घडलेल्या विध्वंसक घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. 'खीर गंगा' नदीने अचानक वाहत येत निम्मे गावच पोटात घेतले. या प्रलयंकारी घटनेने मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत 4 मृतदेह सापडले आणि 100 जण अद्यापही बेपत्ता आहेत. यात 11 जवानही असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आता यामागे निसर्गाच्या एका जुन्या प्रवृत्तीचा संशय व्यक्त केला जात आहे. ही नदी तिच्या पूर्वीच्या, विसरल्या गेलेल्या मार्गावर परतली का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (NRSC) यांनी प्रसिद्ध केलेल्या उपग्रह चित्रांमुळे या घटनेविषयी नवी माहीती समोर आली आहे. 'कार्टोसॅट-2S' या उच्च-रिझोल्युशन उपग्रहाने 13 जून आणि 7 ऑगस्ट रोजी घेतलेली चित्रे यात वापरण्यात आली आहेत.
पहिल्या चित्रात धारली गाव शांत दिसते, पण दुसऱ्या चित्रात गावाचा सुमारे 20 हेक्टर भाग चिखल, दगड आणि ढिगाऱ्याखाली झाकलेला दिसतो — तोही थेट भागीरथी नदीच्या काठापर्यंत.
सुरुवातीला हे ढगफुटीमुळे घडल्याचा अंदाज व्यक्त झाला होता. पण हवामान विभागाने तो नाकारला आहे. 5 ऑगस्ट रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात फक्त 24 मिमी पाऊस नोंदवला गेला — जे ढगफुटीसाठी आवश्यक असलेल्या 100 मिमी प्रतीतासाच्या मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे.
या प्रश्नावर उत्तर देताना नित्यानंद संशोधन संस्थेचे अतिथी प्राध्यापक डॉ. डी. डी. चौहान यांनी मांडलेली शक्यता खूपच विचारप्रवर्तक आहे. त्यांच्यानुसार, 'खीर गंगा' नदीच्या उगमाजवळ असलेले छोटे हिमसरोवर म्हणजेच ग्लेशियल लेक कदाचित फुटले असावेत.
या सरोवरांमध्ये साचलेले पाणी सतत पावसामुळे आणि बर्फाच्या वितळण्यामुळे वाढले आणि एकदा एकदम फुटल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी, बर्फ, आणि दगड नदीत आले असावे.
या स्फोटक प्रवाहामुळे खीर गंगा नदी आपल्या नेहमीच्या वळणावर वळली नाही, आणि सरळ प्रवाह घेत गावाच्या घरांमधून, हॉटेल्समधून वाहून गेली. या भागात पूर्वी नदी वाहत होती का? हा प्रश्नच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ISRO च्या चित्रांनुसार, धारसु परिसर ज्यात धारली येते तो तीन बाजूंनी भागीरथीने वेढलेला आहे. खीर गंगा पर्वतरांगेतून उतरते आणि भागीरथीला मिळण्याआधी वळण घेते. मात्र या वेळी ती वळलीच नाही — सरळ वाहत गावात घुसली.
डॉ. चौहान यांचे म्हणणे आहे की हे नुकसान फक्त निसर्गाचा कोप नाही, तर मानवी विस्मरण आणि अतिक्रमणाचा परिणाम देखील आहे. “जिथे नदी पूर्वी वाहत होती, तिथे आता घरं, लॉजेस, आणि रस्ते बांधले गेले होते,” असं ते म्हणतात. “नदीने आपला जुना मार्ग पुन्हा एकदा घेतल्यासारखं वाटतंय.”
धारलीसारख्या हिमालयीन भागात नदीप्रवाह, भूगर्भीय हालचाली आणि हवामान बदल यांच्या एकत्रित परिणामांचा अंदाज घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ISRO आणि NRSC सध्या वैज्ञानिक विश्लेषण करत आहेत की ही घटना ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (GLOF) मुळे झाली का?
याआधी अशाच घटना उत्तराखंडमध्ये घडल्या आहेत. 2021 मध्ये चमोलीतील रिषीगंगा दुर्घटनेत 200 हून अधिक लोक दगावले होते आणि 2013 मधील केदारनाथ आपत्तीमध्ये जवळपास 5000 लोकांनी प्राण गमावले होते.