Female Biker Hit and Run : एका महिला बायकरचा सतत पाठलाग करून तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची आणि तिथून पोबारा केल्याची धक्कादायक घटना गुडगावमध्ये समोर आली आहे. या अपघाताचा थरार महिलेच्या हेल्मेटवर बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सिया असे नाव असलेल्या या महिला रायडरने अपघाताचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत गुडगाव पोलिसांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सिया ही तिच्या मित्रांच्या ग्रुपसोबत तिची 'ॲप्रिलिया' स्पोर्ट्स बाइक चालवत होती. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या सेडान कारचालकाने तिच्या जवळून अत्यंत धोकादायकरीत्या गाडी चालवत तिला थांबण्याचा इशारा केला. "त्याने गोल्फ कोर्स रोडवर आमचा पाठलाग सुरू केला होता. मी त्याला अंतर ठेवून गाडी चालवण्यास सांगितले. तो मला बाइक थांबवण्याचे इशारे करत राहिला. कारमधील सर्वजण दारूच्या नशेत होते आणि तिने कारपासून अंतर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. माझ्या मित्राने राइडदरम्यान बचाव करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून कार माझ्या जवळ येऊ नये, पण तरीही त्या कारने मला धडक दिली," असे सियाने म्हटलं आहे.
तिच्या आणि मित्रांच्या बाइकवर बसवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओमध्ये ती रस्त्यावर काही फूट घासली जात असल्याचे आणि तिची मोटारसायकल दुसऱ्या दिशेला घसरत असल्याचे दिसून येत आहे. तिच्या एका मित्राने ट्रॅफिक सिग्नलवर कार रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र चालक तिथून वेगाने पळून गेला. पीडित महिलेने कारचा नोंदणी क्रमांकही शेअर केला आहे. "मला काहीही बोलायचे नाहीये, पण आज मला गुरुग्रामच्या रस्त्यांवर असुरक्षित वाटले. अशा लोकांना कोणालाही धडक देऊन पळून जाण्याची भीती वाटत नाही," असेही सियाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
"माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द उरलेले नाहीत, पण आज मला गुडगावच्या रस्त्यांवर अत्यंत असुरक्षित वाटले. अशा लोकांना कोणालाही धडक देऊन पळून जाण्याची कसलीही भीती उरलेली नाही," अशी उद्विग्न प्रतिक्रिया या घटनेनंतर अपघातग्रस्त तरुणी सियाने दिली आहे.
या घटनेबाबत पीडितेची पोस्ट आणि अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने याची दखल घेतली. गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर कारचालकाने धडक दिल्याने महिला बायकर जखमी झाली आहे, अशी माहिती आज (दि. १४ सप्टेंबर) पोलिसांनी दिली. गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी संदीप तुरान यांनी सांगितले की, ही घटना समोर आली असून ते तपशीलांची पडताळणी करत आहेत.
"अपघातानंतर कायदेशीर कारवाईसाठी व्हिडिओच्या साह्याने गोल्फ कोर्स रोडवरील अपघाताचे नेमके ठिकाण आणि संबंधित पोलीस ठाण्याचे क्षेत्र निश्चित करण्याचे काम पोलीस करत आहेत," असे ते म्हणाले. अपघातानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला कोणताही संदेश आला नव्हता किंवा पीडित महिलेकडून कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नव्हती, असे तुरान यांनी स्पष्ट केले. "धडक देणाऱ्या कारचालकाला अटक करण्यासाठी अपघातग्रस्त तरुणीशी संपर्क साधून लेखी तक्रार घेण्याचा प्रयत्न करतील," असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.