Gujarat Local Election Results Pudhari
राष्ट्रीय

Gujarat Election Results: गुजरातमध्ये अयोध्यासारखं कांड! निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का देत आपने फडकवला झेंडा

Gujarat Local Election Results: आम आदमी पक्षाने गुजरातमधील नर्मदा जिल्यात मोठा विजय मिळवत भाजपाला धक्का दिला आहे. चैतर वसावा यांच्या प्रभावामुळे आदिवासी भागात आपला मोठा जनाधार मिळाला.

पुढारी वृत्तसेवा

Gujarat Local Election Results: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं आहे. राज्यभरात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा वर्चस्व राखत अनेक ठिकाणी विजय मिळवला असला, तरी आदिवासीबहुल नर्मदा जिल्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. इथे भाजपाला अनपेक्षित धक्का बसला आणि आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली.

विशेष म्हणजे हा तोच नर्मदा जिल्हा आहे जिथे जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारण्यात आला आहे. भाजपाकडून या प्रकल्पामुळे विकास आणि सामाजिक बदल झाल्याचा दावा सातत्याने केला जातो. मात्र स्थानिक निवडणुकीत मतदारांनी वेगळाच कौल दिला. त्यामुळे या पराभवाची तुलना काही जणांनी अयोध्येतील निकालाशीही केली आहे, जिथे राम मंदिर उभारणीनंतरही भाजपाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नव्हतं.

नर्मदामध्ये ‘आप’ची जोरदार कामगिरी

नर्मदा जिल्यात आम आदमी पक्षाने मोठं यश मिळवलं. सहापैकी चार तालुका पंचायतांमध्ये पक्षाने विजय मिळवला, तर जिल्हा पंचायतच्या २२ पैकी तब्बल १५ जागांवर कब्जा केला. २०२१ मध्ये याच ठिकाणी भाजपाने १९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळचा निकाल भाजपासाठी धक्कादायक मानला जात आहे.

या यशामागे मोठं नाव पुढे येत आहे ते म्हणजे चैतर वसावा. डेडियापाडाचे आम आदमी पक्षाचे आमदार असलेले वसावा हे आदिवासी समाजातील प्रभावशाली नेता मानले जातात. जंगल हक्क, जमीन वाद आणि स्थानिक प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यामुळे आदिवासी भागात त्यांचा मजबूत जनाधार तयार झाला आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर वाढला प्रभाव

गेल्या वर्षी चैतर वसावा यांना अटक करण्यात आली होती. पंचायत अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. काही काळ त्यांना तुरुंगातही राहावं लागलं. मात्र राजकीयदृष्ट्या ही घटना त्यांच्यासाठी फायद्याची ठरल्याचं आता बोललं जात आहे. स्थानिक स्तरावर त्यांच्या समर्थनात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि त्याचा फायदा निवडणुकीत दिसून आला.

कठीण काळात ‘आप’साठी दिलासादायक विजय

हा विजय आम आदमी पक्षासाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण दिल्लीत पक्ष अनेक अडचणींचा सामना करत आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद, न्यायालयीन प्रकरणं आणि राजकीय दबाव अशा अनेक संकटांमध्ये हा निकाल कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारा आहे.

विजयानंतर चैतर वसावा यांनी हा विजय सामान्य जनतेचा असल्याचं म्हटलं. लोकांनी बदल, प्रामाणिकपणा आणि विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनीही आनंद व्यक्त करत डेडियापाडामध्ये भाजपाचा पूर्ण पराभव झाल्याचा दावा केला. गुजरातमध्ये भाजपाचं वर्चस्व कायम असलं तरी नर्मदा जिल्यातील हा निकाल आगामी राजकारणासाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT