दाहोद जिल्ह्यातील अभलोड गावात लग्न समारंभात जेवण केल्यानंतर तब्‍बल ४०० हून अधिक जणांची प्रकृती बिघडली आहे.  pudhari
राष्ट्रीय

Food Poisoning | लग्नातील अन्नातून विषबाधा; ४०० हून अधिक जणांची प्रकृती बिघडली

Gujarat Food Poisoning Cases | गुजरातमध्‍ये विषबाधांच्‍या घटनांची मालिका सुरुच, दाहोद जिल्‍ह्यात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Gujarat Food Poisoning Cases

गुजरातमध्ये अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. ताजी घटना दाहोद जिल्ह्यातील अभलोड गावात घडली असून, येथे एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर ४०० हून अधिक जणांची प्रकृती बिघडली. यापैकी अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही आठवड्यांत राज्यात अशा अनेक घटना समोर आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

विवाह कार्यात अचानक आरोग्‍य आणीबाणी

'पीटीआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, दाहोद जिल्ह्यातील अभलोड गावात विवाहाचे आयोजन करण्‍यात आले होते. जेवणाच्‍या कार्यक्रमानंतर अचानक आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली. संशयित विषबाधेमुळे ४०० हून अधिक पाहुणे आजारी पडले. बाधितांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून आरोग्य विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नेमक्या कोणत्या पदार्थामुळे ही विषबाधा झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दाहोद हा पूर्व गुजरातमधील आदिवासी बहुल जिल्हा असून, येथे यापूर्वीही अन्न सुरक्षेशी संबंधित अशा घटना घडल्या आहेत.

मुलींच्‍या वसतिगृहातही घडला होता विषबाधेचा प्रकार

अहमदाबादमधील मेमनगर येथील एका मुलींच्या वसतिगृहात ५ एप्रिल रोजी विषबाधेचा प्रकार समोर आला. पटेल समाजाद्वारे संचालित या वसतिगृहातील सुमारे ५७ विद्यार्थिनींना जुलाब, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात नेण्यात आले. २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल विद्यार्थिनींची संख्या ३८ वर पोहोचली, ज्यापैकी अनेकांवर स्टर्लिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजपुरा गावात १०० जणांना विषबाधा

गुजरातमध्ये ९ एप्रिल रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील देत्रोज तालुक्यातील राजपुरा गावात एका धार्मिक कार्यक्रमात 'सेव-खवणी' हा लोकप्रिय गुजराती नाश्ता खाल्यानंतर सुमारे १०० जणांना बाधा झाली होती.यापैकी ३८ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर इतरांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.खबरदारीचा उपाय म्हणून, हा नाश्ता खाणाऱ्या इतर २१४ ग्रामस्थांचीही आरोग्य तपासणी करून त्यांना उपचार देण्यात आले.

आरोग्‍य पथके तैनात

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बाधित भागांत आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. अन्नाचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत (Lab) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तिन्ही घटनांचा तपास सुरू असून, अन्नामध्ये नेमके कोणते घातक घटक होते, याचा खुलासा अद्याप प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT