Google Android Mobile Alert
नवी दिल्ली: 'गूगल'ने जगभरातील अँड्रॉइड युजर्ससाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. जगभरातील सुमारे ४० टक्के स्मार्टफोनवर सध्या मालवेअर आणि स्पायवेअरचे मोठे संकट घोंघावत असून, जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे गूगलने म्हटले आहे. 'फोर्ब्स'ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, जे स्मार्टफोन Android 13 किंवा त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात, त्यांना सर्वाधिक धोका आहे. जुन्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमला आता सुरक्षा अपडेट्स मिळत नाहीत, ज्यामुळे ते असुरक्षित झाले आहेत. जगभरात अशा स्मार्टफोन युजर्सची संख्या १ अब्जापेक्षा जास्त आहे.
ज्यांचे मोबाईल जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात, त्यांनी आपला फोन लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसह अपडेट करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, उपलब्ध असल्यास सिक्युरिटी पॅच नियमितपणे अपडेट करत राहावे. जुन्या आयफोनला वेळेवर अपडेट्स मिळतात, मात्र अनेक जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोनला हे अपडेट्स मिळत नाहीत. जर तुमच्या कंपनीने सॉफ्टवेअर सपोर्ट बंद केला असेल, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन स्मार्टफोन खरेदी करणे कधीही चांगले.
स्मार्टफोन उत्पादक कंपन्या साधारणपणे ४ ते ५ वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स देतात. मात्र, आता सॅमसंग आणि गूगल पिक्सल सारख्या कंपन्यांनी ७ वर्षांपर्यंत अपडेट्स देण्याची घोषणा केली आहे. अहवालानुसार, केवळ ५८% स्मार्टफोन सध्या सिक्युरिटी सपोर्टच्या कक्षेत आहेत, तर उर्वरित ४०% स्मार्टफोनसाठी कोणतेही सिक्युरिटी अपडेट्स उपलब्ध नाहीत.
स्मार्टफोनची सुरक्षा मजबूत करण्यासाठी कंपन्या वेळोवेळी सिक्युरिटी अपडेट्स जारी करतात. हे अपडेट्स जुन्या ओएसमधील त्रुटी आणि उणिवा दूर करण्याचे काम करतात. जर हे अपडेट्स नसतील, तर हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊन तुमचा डेटा चोरी करू शकतात किंवा तुमचा फोन हॅक करू शकतात.
जगात अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. सॅमसंग, रियलमी, रेडमी, ओप्पो, वनप्लस यांसारख्या अनेक कंपन्या अँड्रॉइड ओएसचा वापर करतात, तर आयफोनची 'iOS' सिस्टीम फक्त ॲपलच्या उपकरणांपुरती मर्यादित आहे.