Mobile Phone impact | नात्यांचे डिजिटल रूपांतर

Mobile Phone impact
Mobile Phone impact | नात्यांचे डिजिटल रूपांतरFile photo
Published on
Updated on

कावेरी गिरी

आजचा माणूस कधी नव्हे इतका डिजिटली जोडलेला आहे; पण भावनिकपद़ृष्ट्या अधिक एकटा झाला आहे. मोबाईलमुळे संवाद झटपट झाला; मात्र तो खोल राहिला नाही. नाती स्क्रीनवर टिकतात; पण प्रत्यक्ष भेटी, संवाद आणि सहवास कमी झाले आहेत. कुटुंब, मैत्री आणि तरुणाई सगळीकडेच एकटेपणाची छाया दिसते. मोबाईल हा दोषी नाही. त्याचा अतिरेकी वापर ही खरी समस्या आहे. पडद्याआडून बाहेर येऊन समोरच्या माणसाशी संवाद साधणं, ही आजची खरी गरज आहे.

डिजिटल युगाने माणसाच्या आयुष्यात सोयी आणल्या, गती दिली, माहितीचा विस्फोट घडवला; पण या सगळ्या वेगात माणूस स्वतःशी आणि इतरांशी असलेलं नातं मात्र हळूहळू हरवतो आहे, ही बाब अधिक गंभीर आहे. नात्यांमध्ये तंत्रज्ञान शिरलं, ते अपरिहार्य होतं; पण त्यानं नात्यांची दिशा बदलली, ही जाणीव आता तीव्र होत चालली आहे.

कुटुंब : एकत्र असूनही दूर

मोबाईलचा सर्वात मोठा परिणाम कुटुंबावर दिसतो. आई-वडील कामात गुंतलेले, मुलं स्क्रीनमध्ये हरवलेली. संवादाची जागा सूचना आणि आदेशांनी घेतली आहे. ‘अभ्यास कर’, ‘मोबाईल बंद कर’ ही वाक्ये वारंवार ऐकू येतात; पण तुझं काय चाललंय, हा प्रश्न क्वचित विचारला जातो. पूर्वी संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र बसायचं. गप्पा, टीव्ही, गोष्टी. आज प्रत्येकाच्या हातात वेगळा स्क्रीन आहे. एकाच घरात राहूनही वेगवेगळ्या जगात वावरण्याची ही वेळ आहे.

मित्रमैत्रिणी आणि आभासी जवळीक

आजच्या डिजिटल युगात माणूस सतत ‘कनेक्टेड’ आहे, तरीही त्याच्या आयुष्यात एकटेपणाची भावना अधिक तीव्र होत चालली आहे. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आलं, असं वाटत असलं, तरी प्रत्यक्ष नात्यांमधील उब कमी झाली आहे. संवाद वाढले; पण ते बहुतेक वेळा वरवरचे ठरले. भावना शब्दांऐवजी इमोजींमध्ये व्यक्त होऊ लागल्या आणि ऐकण्याऐवजी फक्त प्रतिसाद देण्यावर भर राहिला. पूर्वी संवादासाठी वेळ, संयम आणि प्रतीक्षा लागायची. आज एका क्षणात संदेश पोहोचतो; पण त्यामागची भावना तितकी खोल नसते. घरात सगळे एकत्र असूनही प्रत्येकजण वेगळ्या स्क्रीनमध्ये हरवलेला असतो. जेवणाच्या टेबलावर गप्पांची जागा मोबाईलने घेतली आहे.

संवादाचा वेग आणि संवेदनशीलतेचा अभाव

आज संवाद त्वरित होतो; पण त्यात थांबा नाही. कोणाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच उत्तर तयार असतं. ‘डशशप’ झालं म्हणजे संवाद संपला, अशी मानसिकता तयार झाली आहे. समोरच्याच्या आवाजातील चढ-उतार, चेहर्‍यावरील भाव, डोळ्यांमधली अस्वस्थता, हे सगळं स्क्रीनच्या संवादात गळून पडतं. शब्द पोहोचतात; पण भावना पोहोचतीलच याची खात्री राहत नाही. पूर्वी एखाद्याचं दुःख समजायला वेळ लागायचा; पण ते समजल्यावर माणूस थांबायचा. आज दुःखाची पोस्ट वाचून ‘ढरज्ञश लरीश’ लिहिलं जातं आणि लगेच पुढच्या स्क्रोलमध्ये आयुष्य पुढे सरकतं. ही असंवेदनशीलता मुद्दामहून नाही, तर सततच्या माहितीच्या मार्‍यामुळे तयार झालेली आहे.

नात्यांमध्ये ‘परफॉर्मन्स’चा शिरकाव

डिजिटल जगात नातेसंबंधही एक प्रकारचे परफॉर्मन्स झाले आहेत. आनंद, दुःख, यश, अपयश, सगळं मांडायचं असतं, सादर करायचं असतं. आयुष्य जगण्यापेक्षा ते दाखवण्यावर भर राहतो. परिणामी, नात्यांमध्ये प्रामाणिकपणापेक्षा प्रतिमा महत्त्वाची ठरते. काही वेळा माणूस स्वतःच्या भावना व्यक्त करण्याआधीच विचार करतो, यावर लोक काय म्हणतील? किती लाईक्स मिळतील, ही आत्मजाणीव नात्यांमध्ये नकळत भिंत उभी करते. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाण्याऐवजी आपण दाखवतो तसेच ओळखले जातो.

मुलं, पालक आणि बदलतं बालपण डिजिटल नात्यांचा परिणाम सर्वाधिक पुढच्या पिढीवर होत आहे. आजची मुलं स्क्रीनसोबत मोठी होत आहेत. खेळ, संवाद, शिकणं सगळं डिजिटल आहे. याचे फायदे नाकारता येणार नाहीत; पण त्याचबरोबर भावनिक शब्दसंपत्ती कमी होत चालली आहे. पालकांकडे वेळ कमी आहे आणि मुलांकडे लक्ष वेधण्यासाठी मोबाईल आहे. रडणार्‍या मुलाला खेळणं देण्याऐवजी स्क्रीन दिली जाते. त्यामुळे मूल शांत होतं; पण त्याच्या भावनांशी संवाद साधण्याची संधी निसटते. पुढे जाऊन हीच मुलं भावना व्यक्त करण्यात, नातेसंबंध टिकवण्यात अडखळताना दिसतात.

तरुणाई आणि एकटेपणाचं वाढतं सावट

नातीही आता डिजिटल झाली आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्टवर, दुःख व्यक्त होतं स्टेटसमधून. ‘लाईक’ आणि ‘व्ह्यूज’ हेच नात्यांचं मोजमाप बनत चाललं आहे. कुटुंबात संवादाऐवजी सूचना वाढल्या आहेत, तर मैत्रीत खोलीपेक्षा संख्येला महत्त्व मिळालं आहे. सर्वाधिक परिणाम तरुणाईवर दिसतो. सतत ऑनलाईन असूनही ती एकटेपणाशी झुंज देत आहे. तुलना, अपेक्षा आणि परिपूर्ण आयुष्याच्या आभासी प्रतिमा यामुळे मानसिक ताण वाढतो आहे. मोबाईल माणसाला व्यस्त ठेवतो; पण समाधान देत नाही.

विवाह, प्रेम आणि डिजिटल अपेक्षा

प्रेमसंबंध आणि वैवाहिक नात्यांवरही डिजिटल जगाचा प्रभाव खोलवर जाणवतो. सततची तुलना, इतरांचं ‘परफेक्ट’ दिसणारं आयुष्य, अपेक्षांची वाढ यामुळे नात्यांमध्ये असंतोष वाढतो. जोडीदाराकडूनही सोशल मीडियावर दिसणार्‍या नात्यांसारखंच काहीतरी हवं असतं. यात संवादाऐवजी गैरसमज वाढतात. न बोलता गृहित धरलं जातं आणि नातं नकळत ताणाखाली येतं. डिजिटल जग नात्यांना पर्याय देतं; पण पर्याय नेहमीच समाधान देतात असं नाही. सतत व्यस्त असणं ही आजची ओळख बनली आहे; पण या व्यस्ततेत माणूस स्वतःशी एकटा पडतो आहे. एकटेपणा आता अपवाद न राहता सर्वसाधारण अनुभव बनतो आहे. लोकांमध्ये असूनही एकटं वाटणं, संवाद असूनही न समजलं जाणं, ही भावना वाढते आहे.

मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये याचं प्रतिबिंब दिसतं. चिंता, नैराश्य, असमाधान यामागे केवळ वैयक्तिक कारणं नाहीत, तर नात्यांमधील ही डिजिटल दरीही आहे.

जबाबदारी कुणाची?

तंत्रज्ञान वाईट नाही; प्रश्न त्याच्या वापराचा आहे. मोबाईल साधन असावं, आयुष्याचं केंद्र नसावं. नाती टिकवण्यासाठी वेळ, उपस्थिती आणि संवाद आवश्यक असतो, जे कोणतंही अ‍ॅप देऊ शकत नाही. डिजिटल शिस्त ही वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी आहे. काही वेळ ‘ऑफलाईन’ राहणं, संवादासाठी वेळ राखून ठेवणं, कुटुंबासोबत मोबाईलशिवाय बसणं, या छोट्या गोष्टी मोठा फरक घडवू शकतात. खर्‍या नात्यांसाठी पडद्याआडून बाहेर येण्याची गरज आहे. मोबाईल बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे पाहणं, त्याचं ऐकणं आणि त्याच्यासोबत वेळ घालवणं, यातूनच हरवत चाललेली नात्यांची उब पुन्हा मिळू शकते.

मोबाईलमुळे जग जवळ आलं; पण माणसं दूर गेली, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही दरी वाढत जाण्याआधीच आपण थांबलो, तर नाती वाचू शकतात. प्रश्न मोबाईलचा नाही. प्रश्न आपल्या निवडींचा आहे. डिजिटल जगात सगळं नियंत्रित करता येतं. काय दाखवायचं, काय लपवायचं, कुणाशी बोलायचं, कुणाला ब्लॉक करायचं, सगळं एका क्लिकवर शक्य आहे; पण नाती अशी नियंत्रित करता येत नाहीत. त्यांना वेळ लागतो, संयम लागतो, समोरासमोरचा सहवास लागतो. तंत्रज्ञान आपल्या हातात आहे; पण नात्यांची दोरी आपल्या मनात हवी. ती घट्ट ठेवायची की हळूहळू सैल होऊ द्यायची, हा निर्णय आपलाच आहे. पडदा बाजूला सारून माणसाकडे पाहायचं धाडस आपण केलं, तरच हरवत चाललेलं मानवी नातेसंबंधांचं जग पुन्हा सापडू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news