

आजच्या डिजिटल युगात मोबाइल फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाइल हातात असतो. अनेक जण तर रात्री झोपताना मोबाइल थेट बेडवर, उशीजवळ किंवा डोक्याच्या बाजूला ठेवून झोपतात. काहींना अलार्मसाठी मोबाइल जवळ हवा असतो, तर काही जण झोपण्याआधी सोशल मीडिया, व्हिडिओ किंवा चॅट पाहण्याची सवय ठेवतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते अशी सवय आरोग्यासाठी हळूहळू घातक ठरू शकते.
डॉक्टर सांगतात की, रात्री झोपताना मोबाइल जवळ ठेवल्यामुळे सर्वात मोठा परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होतो. मोबाइलमधून निघणारी ब्लू लाईट मेंदूतील मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी करते. हे हार्मोन आपल्याला शांत झोप येण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे उशीजवळ मोबाइल ठेवून झोपल्यास झोप उशिरा लागणे, वारंवार जाग येणे किंवा अपुरी झोप होण्याच्या समस्या वाढतात.
याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. अपुरी झोप झाल्यास चिडचिड, तणाव, चिंता आणि नैराश्याची लक्षणे वाढू शकतात. अनेक जण सकाळी उठल्यावर थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवते, अशी तक्रार करतात. यामागे रात्री मोबाइल जवळ ठेवण्याची सवय एक कारण ठरू शकते.
मोबाइल थेट डोक्याजवळ ठेवणे टाळणे अधिक योग्य
मोबाइल फोनमधून कमी प्रमाणात का होईना, रेडिएशन निघते. दीर्घकाळ डोक्याजवळ मोबाइल ठेवल्यास त्याचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो, असा इशारा काही तज्ज्ञ देतात. जरी यावर अजून संशोधन सुरू असले, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाइल थेट डोक्याजवळ ठेवणे टाळणे अधिक योग्य मानले जाते.
याशिवाय, मोबाइल चार्जिंगला लावून बेडवर ठेवून झोपणे धोकादायक ठरू शकते. अनेक वेळा मोबाइल ओव्हरहीट होण्याच्या घटना घडतात. बेडशीट, उशी किंवा चादरीमुळे उष्णता बाहेर न गेल्यास आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काही देशांमध्ये अशा घटनांमुळे गंभीर अपघातही घडल्याची उदाहरणे आहेत.
डोळ्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो. झोपण्याआधी स्क्रीन पाहण्याची सवय असल्यास डोळे कोरडे पडणे, जळजळ, धूसर दिसणे यांसारख्या समस्या वाढतात. याला “डिजिटल आय स्ट्रेन” असेही म्हटले जाते. विशेषतः तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये ही समस्या वाढताना दिसत आहे.
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, चांगली आणि शांत झोप हवी असेल तर मोबाइल बेडपासून किमान ३ ते ५ फूट अंतरावर ठेवावा. झोपण्याआधी किमान अर्धा तास मोबाइल वापरणे टाळावे. अलार्मसाठी वेगळे घड्याळ वापरणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच बेडरूममध्ये झोपेसाठी शांत आणि अंधुक वातावरण ठेवणे फायदेशीर ठरते.
एकूणच, बेडवर किंवा उशीजवळ मोबाइल ठेवून झोपण्याची सवय तात्पुरती सोयीची वाटत असली, तरी दीर्घकाळात ती आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. चांगल्या झोपेसाठी आणि मानसिक-शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी या सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.