नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच देशातील २५ राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा हटवण्याची मोठी योजना आखत आहे. यासाठी, मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) ही नवीन टोलिंग प्रणाली सुरू केली जात आहे. रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा मुख्य उद्देश टोल वसुलीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवणे आणि देशभरात जलद व स्मार्ट महामार्ग नेटवर्क तयार करणे हा आहे.
MLFF ही एक अडथळामुक्त टोलिंग प्रणाली आहे. यामध्ये टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही. उच्च कार्यक्षमता असलेले RFID रीडर्स आणि ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन) कॅमेरे वाहनांवरील फास्टॅग आणि नंबर प्लेट स्कॅन केले जाते. यामुळे वाहन न थांबता टोलची रक्कम स्वयंचलितपणे कापली जाते. या प्रणालीमुळे वाहतूक कोंडी आणि गर्दीची समस्या कमी होईल. परिणामी, प्रवासाचा वेळ वाचेल. इंधनाची बचत होईल आणि कार्बन उत्सर्जनही कमी होईल, असे सांगण्यात येत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) २०२५-२६ या आर्थिक वर्षात २५ राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर MLFF आधारित टोल व्यवस्था सुरू करण्याची योजना आखत आहे. सध्या, या टोल प्लाझांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुजरात येथील चोर्यासी फी प्लाझा हा देशातील पहिला अडथळामुक्त टोल प्लाझा बनण्याच्या मार्गावर आहे. यासाठी इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) आणि ICICI बँकेमध्ये एक महत्त्वपूर्ण करार करण्यात आल्याचे समजते आहे.
भारतीय महामार्ग नेटवर्कची सद्यस्थिती
सध्या, भारतातील रस्ते नेटवर्क ६३ लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आहे. यापैकी राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी १,४६,३४२ किलोमीटर आहे. २०१४ मध्ये ही लांबी ९१,२८७ किलोमीटर होती. गेल्या दशकात राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कमध्ये ५५,०५५ किलोमीटरची वाढ झाली आहे.