

नवी दिल्ली: अनेक तरुण कठोर परिश्रमाने युपीएससीची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवतात, याच परीक्षेत हजारो तरुण खूप सक्षम असतात मात्र थोड्या फरकाने अंतिम यादीत पोहोचू शकत नाहीत. आता अशा हुशार विद्यार्थ्यांना 'प्रतिभा सेतू' सारख्या प्लॅटफॉर्म द्वारे नामांकित खाजगी कंपन्या नोकऱ्या देतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.३१) केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.३१) 'मन की बात' कार्यक्रमाच्या १२५ व्या भागात देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काश्मीरमधील सामने, यूपीएससी परीक्षा, डोंगराळ भागात झालेला विनाशकारी पाऊस आणि भूस्खलन अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात नैसर्गिक आपत्तींपासून केली. डोंगरांमध्ये पाऊस आपत्ती बनला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांसह सुरक्षा दलांनी सर्व शक्य मदत करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. सांगतानाचा त्यांनी बचाव कार्याचीही माहिती दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील २ महत्त्वाच्या घडामोडींचा उल्लेख केला. पुलवामाच्या स्टेडियममध्ये रॉयल प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यासाठी विक्रमी संख्येने लोक जमले होते आणि येथे दिवसरात्र क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. पूर्वी ते होणे अशक्य होते, मात्र आता देश बदलत आहे. देशातील पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव श्रीनगरमधील दल सरोवर येथे आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण भारतातील ८०० हून अधिक खेळाडूंनी त्यात भाग घेतला होता. एक भारत श्रेष्ठ भारत आणि देशाच्या एकतेची भावना देशाच्या विकासासाठी खूप महत्वाची आहे. यामध्ये खेळांची मोठी भूमिका आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
नागरी सेवा परीक्षेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, अनेक तरुण कठोर परिश्रमाने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवतात. मात्र याच परीक्षेतील एक कटू सत्य म्हणजे हजारो तरुण खूप सक्षम असताना थोड्या फरकाने ते अंतिम यादीत पोहोचू शकत नाहीत. आता अशा हुशार विद्यार्थ्यांसाठी "प्रतिभा सेतू" नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मवर अशा १० हजारांहून अधिक तरुणांची माहिती आहे. या पोर्टलच्या मदतीने खाजगी कंपन्याही हुशार उमेदवारांना नोकऱ्या देऊ शकतात.
दरम्यान, 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मा योजनेबद्दलही सांगितले. ऑपरेशन पोलोचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुढच्या महिन्यात आपण हैदराबाद मुक्ती दिन देखील साजरा करू. लोहपुरुष सरदार पटेल यांनी सरकारला ऑपरेशन पोलो सुरू करण्याची विनंती केली आणि विक्रमी वेळेत सैन्याने हैदराबादला निजामाच्या अत्याचारातून मुक्त केले आणि देशाचा एक भाग बनवले, असेही ते म्हणाले.