नवी दिल्ली ः वाढलेल्या किमतीमुळे नोव्हेंबरमध्ये भारत आणि चीनमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी घटली आहे. सोन्यावर आधारित एक्सचेंज-ट्रेडेड फंड्समधील (ईटीएफ) गुंतवणूक कायम आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोन्याची आयात ५९ टक्क्यांनी घटून ४ अब्ज डॉलरवर आली असल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) संशोधन प्रमुखांनी दिली.
देशांतर्गत सोन्याच्या किमतीमध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिली जाणारी सूट प्रतिऔंस (२८.३४ ग्रॅम) ११ डॉलरवरून १२ डिसेंबरपर्यंत ३० डॉलरपर्यंत वाढली आहे. दागिन्यांची मागणी मंदावली असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे डब्ल्यूजीसीच्या भारत विभागाच्या संशोधन प्रमुख कविता चॅको यांनी सांगितले. भारतातील मागणीतील मंदीचा आणखी एक संकेत म्हणजे नोव्हेंबरमध्ये आयातीत झालेली ७३ टक्क्यांची घट. गतवर्षीच्या तुलनेत आयात ५९ टक्क्यांनी घटून ४ अब्ज डॉलरवर आली आहे. सणासुदीनंतर मागणी आणि आयातीतील ही पहिलीच घट आहे. सणासुदीनंतरची मागणी घटल्यामुळे नोव्हेंबरमधील सोने आयातीचे प्रमाण ३२ ते ४० टनांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे.
चीनमधील आयातही घटली...
चीनच्या डब्ल्यूजीसीचे संशोधन प्रमुख रे जिया म्हणाल्या की, ऑक्टोबरमध्ये चीनची सोन्याची आयात सप्टेंबरमधील ५७ टनांवरून ३६ टनांपर्यंत आली आहे. तर, गतवर्षी याच कालावधीत चीनमध्ये ४३ टन सोन्याची आयात करण्यात आली होती.
ईटीएफमध्ये होतेय गुंतवणूक...
भारतात, नोव्हेंबरमध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक मागील दोन महिन्यांच्या तुलनेत मंदावली आहे. ईटीएफमधील निव्वळ गुंतवणूक ३,७४० कोटी रुपये (४२.१ कोटी डॉलर) होती. ऑक्टोबरच्या तुलनेत ईटीएफमधील गुंतवणूक निम्मी झाली आहे. वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांतील सरासरी मासिक गुंतवणूक २,७६० कोटी रुपये (३१.५ कोटी डॉलर) आहे. त्याहून नोव्हेंबरमधील गुंतवणूक अधिक आहे.