Crime News
आंध्र प्रदेश : प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचा राग मनात धरून एका महिलेने सूडाची भयानक मर्यादा ओलांडली. आपल्या प्रियकराचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याच्या डॉक्टर पत्नीला 'HIV' संक्रमित रक्ताचे इंजेक्शन दिले. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
बी. बोया वसुंधरा (वय ३४) असे संशयीत आरोपी महिलेचे नाव आहे. वसुंधराचे एका व्यक्तीवर प्रेम होते, मात्र त्याने एका महिला डॉक्टरशी लग्न केले. हा धक्का सहन न झाल्याने वसुंधराने या दाम्पत्याला वेगळे करण्याचा कट रचला. यासाठी तिने एका खासगी रुग्णालयातील नर्स कोंग ज्योती (वय ४०) आणि तिच्या दोन मुलांना कटात सामील करून घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका सरकारी रुग्णालयातून 'संशोधन' करत असल्याचे सांगून HIV बाधित रुग्णांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. हे रक्त वसुंधराने फ्रिजमध्ये साठवून ठेवले होते. ९ जानेवारी रोजी दुपारी जेव्हा पीडित महिला डॉक्टर ड्युटी संपवून स्कूटरवरून घरी परतत होत्या, तेव्हा आरोपींनी त्यांच्या स्कूटरला दुचाकीने जोरात धडक दिली.
अपघातानंतर पीडित डॉक्टर जखमी होऊन खाली पडल्या. त्याच वेळी मदतीचा बहाणा करून वसुंधरा तिथे पोहोचली. पीडितेला रिक्षात बसवत असतानाच, गर्दीचा फायदा घेऊन वसुंधराने HIV संक्रमित रक्ताचे इंजेक्शन त्यांच्या शरीरात टोचले. पीडितेने आरडाओरडा केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
पीडित महिलेचे पतीदेखील डॉक्टर असून त्यांनी १० जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे २४ जानेवारी रोजी बी. बोया वसुंधरा, नर्स कोंग ज्योती आणि तिच्या दोन मुलांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.