Gen Z:
दिल्ली: आजच्या तरुण पिढीसाठी, म्हणजेच जनरेशन झेड (Gen Z) साठी प्रेम, जवळीकता आणि नात्याची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. पूर्वीच्या पिढ्यांसाठी, अगदी मिलेनियल्ससाठीही 'हात धरणं' हा नात्याचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जायचा. शारीरिक संबंधाचा विचार खूप नंतर होत असे. पण, आजचा काळ उलटा झाला आहे! अनेक Gen Z तरुणांना शारीरिक संबंध ठेवणे अधिक सोपे वाटते, पण हात धरणं, मिठी मारणं किंवा डोळ्यांत बघणं अशा गोष्टींना ते खूप भावनिक मानतात. Gen Z च्या नात्यांमधील या मोठ्या बदलामागे तज्ञ काय कारणं सांगतात, जाणून घ्या...
आजच्या 'हुकअप' आणि 'सिच्युएशनशिप' च्या जमान्यात, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये अनेक Gen Z तरुणांसाठी हे चित्र आहे. आज डेटिंग ॲप्स आणि बदललेल्या सामाजिक दृष्टिकोनामुळे शारीरिक संबंध ठेवणे सहज शक्य झाले आहे आणि ते अनेकदा भावना किंवा प्रेम नसतानाही होते. तज्ञांच्या मते, Gen Z साठी भावना व्यक्त करणे हे नवीन आहे. सततच्या डिजिटल आणि 'कॅज्युअल डेटिंग'च्या काळात, लोक शरीरापेक्षा आपल्या भावनांना जास्त जपत आहेत. त्यामुळे, हात धरणे, लक्षपूर्वक ऐकणे किंवा सातत्याने सोबत असणे हे शारीरिक संबंधांपेक्षाही अधिक अवघड आणि जबाबदारीचे समजले जाते.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी अनेक Gen Z तरूणांसोबत संवाद साधला. यामध्ये जयपूरमधील २२ वर्षीय श्रेया भौमिक सांगते, "आमच्या पिढीसाठी शारीरिक संबध सहज उपलब्ध झाले आहेत, पण पण त्यात भावना नसतात." दिल्लीतील मेघना सिन्हा (नाव बदलले आहे) या तरुणीसाठी नुकत्याच झालेल्या भेटीतील पहिला किस नाही, तर हातात हात घेतल्याचा क्षण अधिक भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. ती सांगते, "किसपेक्षा हात पकडल्यामुळे मनात अधिक भावनिक जवळीकता निर्माण झाली." पुण्यातील २१ वर्षीय अनिशा शेट्टी (नाव बदललेले आहे) सांगते की, ती आणि तिचे मित्र-मैत्रिणी भावना व्यक्त करण्यापेक्षा लैंगिक संबंधाबद्दल अधिक मोकळेपणाने बोलतात. त्यांच्यासाठी भावनिक नाते निर्माण करणे कठीण आहे.
तज्ञ सांगतात की, "यामागचे मुख्य कारण Gen Z आपली भावना एका मौल्यवान वस्तू प्रमाणे जपत आहेत, कारण त्यांना असुरक्षितता आणि लोकांच्या टीकेची भीती वाटते. ही पिढी भावनिकदृष्ट्या व्यक्त व्हायला घाबरते, कारण सोशल मीडियावर सर्वकाही दिसतं. त्यामुळे शारीरिक नातं सामान्य म्हणता येतं, पण भावनिक जवळीक म्हणजे एकप्रकारे खरं आत्मसमर्पण वाटतं. त्यामुळेच Gen Z ला भावनिकरित्या व्यक्त होणे धोकादायक वाटते."
हात धरणं म्हणजे केवळ रोमँटिक इशारा नाही; ते प्रेम, आणि विश्वास दाखवण्याचा मार्ग आहे. मानसशास्त्रज्ञ सांगतात की, गैर-लैंगिक स्पर्श पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय करतो, ज्यामुळे शांतता, सुरक्षितता आणि सहानुभूती वाढते. यामुळे हृदयाचे आणि मेंदूचे आरोग्य सुधारते आणि विश्वास निर्माण होतो. आजच्या जेन झेड पिढीसाठी शारीरीक संबंध ठेवणे सहज झाले असले तरी, 'हात धरणं' ते फक्त खास व्यक्तीसाठी राखून ठेवलं जातं, ज्याच्याशी ते आपली भावना मनापासून शेअर करू शकतील.