Gen Z prefers Tier-2 cities
नवी दिल्ली : देशातील तरुण पिढी शिक्षण आणि रोजगारासाठी गावं आणि लहान शहरांमधून महानगरांकडे धाव घेत असते. मात्र, आता हे चित्र बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात जनरेशन झेड (Generation Z) म्हणजेच १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी दिल्ली-मुंबईसारख्या गर्दीच्या मेट्रो शहरांऐवजी टियर-२ म्हणजेच छोट्या पण प्रगत शहरांमध्ये राहणे अधिक पसंत करत आहे.
आता पिढी बदललीय आणि त्यांच्या गरजाही; लहान शहरांमध्ये आज चांगली इंटरनेट स्पीड, आधुनिक सुविधा, स्वच्छ हवा आणि शांत जीवनशैली या सगळ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. टियर-२ शहरांमध्ये लोकांना आधुनिक सुविधा तर मिळत आहेतच, शिवाय तिथे सांस्कृतिक परंपरा जपलेली आहे. आजच्या काळात 'रिमोट वर्क'चे (Remote Work) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या रिमोट वर्क कल्चरमुळे तरुण पिढी टियर-२ शहरांमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहे. महानगरांच्या तुलनेत लहान शहरांमध्ये परवडणारी घरं, सोयीस्कर प्रवास उपलब्ध आहे. 'स्मार्ट सिटीज मिशन' (Smart Cities Mission) आणि 'विशेष आर्थिक क्षेत्र' (SEZ) यांसारख्या सरकारी योजनांमुळे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने टियर-२ शहरं अधिक आकर्षक बनली आहेत.
जेनपॅक्ट (Genpact), एचसीएल टेक (HCL Tech), कॉग्निझंट (Cognizant) आणि इन्फोसिस (Infosys) यांसारख्या जागतिक टेक कंपन्या मेलूर, नागपूर, लखनौ आणि भुवनेश्वर येथे आपली कार्यालयं उघडत आहेत. अर्न्स्ट अँड यंग (EY) नुसार, टियर-२ शहरांमध्ये व्हर्च्युअल-फर्स्ट ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) आणि आयटी (IT) तसेच बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्रात कंपन्या आपला विस्तार करत आहेत. रँडस्टॅड २०२५ च्या अहवालानुसार, या शहरांमधील नोकरीच्या संधींमध्ये सुमारे ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मेट्रो शहरांमध्ये ही वाढ केवळ १९ टक्के राहिली आहे.
टियर-२ शहरांमधील कर्मचारी महानगरांमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत २५-३५ टक्के कमी कमावतात, पण लहान शहरांमध्ये राहण्याचा खर्चही खूप कमी असतो. जयपूर, पुणे आणि वडोदरा यांसारख्या इतर टियर-२ शहरांमध्ये अभियांत्रिकी संस्था आणि व्यावसायिक केंद्रांची संख्या सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे या शहरांमध्ये शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होत आहे.