Gen Z dating trends File Photo
राष्ट्रीय

Gen Z dating trends: झेन् झी मध्ये 'क्रश रिसेशन'; प्रेम पाहिजे, पण डेटिंग नको? काय आहे हा नवा ट्रेंड

आजच्या ‘झेन् झी’ पिढीतील अनेक तरुण-तरुणी कोणाला पसंद करत असले, तरी त्यांच्याशी बोलण्यात किंवा डेटिंग करण्यात फारसा रस दाखवताना दिसत नाहीत.

पुढारी वृत्तसेवा

Gen Z dating trends:

नवी दिल्ली : कोणावर तरी प्रेम होणे, त्याच्याशी बोलण्यासाठी आसुसणे आणि मेसेजची वाट पाहणे... प्रेमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या गोष्टी अगदी साहजिक मानल्या जातात. मात्र, आजच्या ‘झेन् झी’ पिढीतील अनेक तरुण-तरुणी कोणाला पसंद करत असले, तरी त्यांच्याशी बोलण्यात किंवा डेटिंग करण्यात फारसा रस दाखवताना दिसत नाहीत. सोशल मीडियावर या नव्या मानसिक बदलाला ‘क्रश रिसेशन’ असे नाव दिले गेले आहे.

नेमके काय आहे ‘क्रश रिसेशन’?

'क्रश रिसेशन' म्हणजे असा एक ट्रेंड, ज्यामध्ये कोणावर क्रश जडणे, डेटिंग करणे किंवा रोमँटिक नात्यात अडकण्याचे आकर्षण तरुणांमध्ये झपाट्याने कमी होत चालले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, लोकांना प्रेम हवे आहे; परंतु जोडीदार शोधण्याच्या आणि डेटिंगच्या खडतर प्रक्रियेचा त्यांना आता कंटाळा आला आहे.

यामागे डेटिंग अ‍ॅप्सचा अतिवापर, नाकारले जाण्याची भीती, आर्थिक ताणतणाव आणि नातेसंबंधांमधील ताण ही मुख्य कारणे असल्याचे मानले जात आहे. विशेषतः 'झेन् झी'च्या डेटिंग लाईफच्या संदर्भात सध्या या शब्दाची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात, हा अजून कोणताही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेला ट्रेंड नसून, सोशल मीडियावरून रुढ झालेला एक शब्द आहे. 'सायकोलॉजी टुडे' मधील एका लेखानुसार, आजकाल अनेक तरुण-तरुणी डेटिंगबाबत पूर्वीसारख्या उत्साही राहिलेल्या नाहीत. डेटिंगमुळे येणारा थकवा, आर्थिक अडचणी आणि नात्यांविषयी वाढणारी संभ्रमावस्था ही यामागील प्रमुख कारणे आहेत.

डेटिंगपासून दूर का जात आहेत तरुण?

आजच्या काळात कोणाला फक्त पसंद करणे पुरेसे ठरत नाही. त्याच्याशी संवाद साधणे, भेटीगाठी वाढवणे आणि नाते पुढे नेण्यासाठी वेळ, पैसा आणि प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च करावी लागते. इतके सगळे करूनही भविष्यात नाते कोणत्या दिशेने जाईल, याची कोणतीही खात्री नसते.

तज्ज्ञांच्या मतसानुसार (मते), डेटिंगवर होणारा खर्च, कामाचा ताण आणि भविष्याबाबतची अनिश्चितता तरुणांचा उत्साह मावळवत आहे. डेटिंग अ‍ॅप्सवर सतत नवीन लोकांना भेटणे आणि नात्याबाबत स्पष्ट प्रतिसाद न मिळणे यामुळे तरुण मानसिकदृष्ट्या थकले आहेत. अनेकांना रिजेक्शनची भीती वाटते, त्यामुळे ते कोणाला पसंद करत असले तरी पहिला मेसेज करणे किंवा आपल्या भावना व्यक्त करण्याचे टाळतात. याउलट, काही जण डेटिंगपासून काही काळ जाणीवपूर्वक ब्रेक घेणे पसंत करत आहेत.

अभ्यासात काय समोर आले?

किन्से इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध डेटिंग अ‍ॅप 'मॅच' यांनी २०२५ मध्ये केलेल्या ‘सिंगल्स इन अमेरिका’ या अभ्यासात ५,००१ सिंगल व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणातील आकडेवारी लक्षणीय आहे:

  • ५३ टक्के लोकांनी आपण डेटिंग करून पूर्णपणे थकलो असल्याचे कबूल केले.

  • ४६ टक्के लोकांनी काही काळासाठी डेटिंगपासून पूर्णपणे ब्रेक घेतला होता.

  • ६३ टक्के लोकांचे म्हणणे होते की, त्यांनी इतरांमध्ये संवाद सुरू करण्यात किंवा संवादाचे पहिले पाऊल उचलण्यात कमालीची उदासीनता असल्याचे पाहिले आहे.

झेन् झी ला प्रेम नको आहे का?

‘क्रश रिसेशन’चा अर्थ असा मुळीच नाही की आजच्या तरुणांना प्रेमाची गरज उरलेली नाही. त्यांना कदाचित जोडीदार हवा असेल, परंतु डेटिंगचे खटाटोप आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासापासून त्यांना लांब राहायचे आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जणांना डेटिंग करणे आवडते, तर काही जण एकटे राहण्यातच आनंदी आहेत. त्यामुळे, ‘झेन् झी’ने प्रेम करणे सोडले आहे, असे सरसकट म्हणणे चुकीचे ठरेल. हा केवळ डेटिंगकडे पाहण्याच्या काही तरुणांच्या बदलत्या दृष्टिकोनाला नाव देणारा एक नवा शब्द आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT