'इस्रो'चे माजी अध्यक्ष कस्तुरीरंगन File Photo
राष्ट्रीय

ISRO News|'इस्रो'चे माजी अध्यक्ष कस्तुरीरंगन यांचे निधन

डॉ. के. कस्तुरीरंगन हे १९९४ ते २००३ पर्यंत इस्रोचे प्रमुख होते

पुढारी वृत्तसेवा

ISRO News updates

बंगळूर : वृत्तसंस्था

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी बंगळूर येथे त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २७ एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव रमण संशोधन संस्थेत (आरआरआय) जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल. कस्तुरीरंगन यांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वात चांद्रयान मोहिमांचा पाया रचला. ते १९९४ ते २००३ पर्यंत इस्रोचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांची योजना आखण्यास सुरुवात केली. त्यांच्या निधनामुळे विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कस्तुरीरंगन यांच्या कुशल नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे उपग्रह इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आले. त्यांचे लक्ष नावीन्यपूर्णतेवर असायचे. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक होते.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व

त्यांनी विज्ञान क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही अपूर्व योगदान दिले. नवीन शिक्षण धोरणाच्या (एनईपी) मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कुलगुरू आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. ते २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले होते. कस्तुरीरंगन हे एप्रिल २००४ ते २००९ पर्यंत बंगळूरस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक होते. त्यांनी केंद्राच्या अनेक समित्यांचे नेतृत्व केले होते.

डॉ. कस्तुरीरंगन यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त केला. डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे दरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्रासाठी निस्वार्थी योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांनी इस्रोची सेवा मोठ्या परिश्रमाने केली. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले. त्यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण देखील झाले आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT