'ISRO'ला मिळणार बूस्टर ! केंद्रीय मंत्रिमंडळाची नवीन लाँच पॅडला मंजुरी
पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने SpaDeX मोहिम यशस्वी करत आज (दि.१६) जागतिक अवकाश क्षेत्रात नवीन इतिहास रचला. अवकाशात २ उपग्रहांमध्ये डॉकिंग प्रयोग इस्रोने यशस्वीपणे पूर्ण केला. अवकाशात 'डॉकिंग' करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत 'चौथा' देश ठरला. या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत इस्रोला बूस्टर देणारी योजना घोषित करण्यात आल्याची माहिती इस्रोने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरून (X) आज (दि.१६) दिली आहे.
पुढील ४८ महिन्यात उभारणार नवीन लाँच पॅड (TLP)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरा लाँच पॅड (TLP) उभारण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती इस्रोने 'एक्स'वरून दिली आहे. यासाठी ३९८५ कोटी रुपये केंद्राने मंजूर केले असून, पुढील ४८ महिन्यात हे लाँच पॅड उभारण्यात येणार असल्याचे देखील मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेले हे नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल्स भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाण मोहिमा आणि LVM-3 लाँच मोहिमांच्या प्रक्षेपणासाठी मदत करेल, असे देखील भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
तिसरे लाँच पॅड (TLP) वैशिष्ट्ये
श्रीहरिकोटातील सतीश धवन केंद्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिसरा लाँच पॅड (TLP) ची रचना अशी आहे की, ती शक्य तितकी सार्वत्रिक आणि अनुकूलनीय आहे. जी केवळ NGLVच नव्हे तर सेमीक्रायोजेनिक स्टेज असलेल्या LVM3 वाहनांना तसेच NGLV च्या स्केल अप कॉन्फिगरेशनला देखील पुरक असल्याचे 'PIB ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

