

पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रोने पुन्हा एकदा अंतराळात एक मोठी कामगिरी केली आहे. इस्रोने त्यांच्या स्पाडेएक्स मोहिमेअंतर्गत दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्यात यश मिळवले आहे. विज्ञान तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्स (X) पोस्टवरून ही माहिती दिली आहे.
मंत्री जितेंद्र सिंग यांनी 'X'वर पोस्ट केली आणि लिहिले, उपग्रहांचे दुसरे डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे हे कळवताना आनंद होत आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, PSLV-C60 / SPADEX मोहीम 30 डिसेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली. त्यानंतर 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 06:20 वाजता उपग्रहांना प्रथमच यशस्वीरित्या डॉक करण्यात आले आणि 13 मार्च 2025 रोजी सकाळी 09:20 वाजता यशस्वीरित्या अनडॉक करण्यात आले. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा अवकाशात यशस्वी विनाअडथळा दुसरे डॉकिंग करण्यात आले". पुढील दोन आठवड्यात पुढील प्रयोग करण्याचे नियोजन आहे.
भारताची महत्त्वाकांक्षी 'स्पाडेक्स' मोहिम श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ३० डिसेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आली होती. या मोहिमेत पीएसएलव्ही (PSLV) रॉकेट वापरून सुमारे २२० किलो वजनाचे दोन खास डिझाइन केलेले उपग्रह प्रक्षेपित करण्याचे उद्दिष्ट्ये होते. चेसर (SDX01) आणि टार्गेट (SDX02) असे हे उपग्रह पृथ्वीपासून ४७० किलोमीटर उंचीवर इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे 'डॉक' करण्यात आले. भारताच्या अवकाश तंत्रज्ञातील ही कामगिरी उल्लेखनिय आहे. कारण रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनी यापूर्वी अशा गुंतागुंतीच्या स्पेस डॉकिंग तंत्रांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. त्यानंतर भारताने देखील डॉकिंग प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण करून जागतिक स्तरावर अवकाश क्षेत्रात मैलाचा दगड पार केला आहे.
भारताच्या डॉकिंग प्रात्यक्षिकांच्या यशस्वी प्रयोगामुळे इथून पुढील अनेक अवकाश मोहिमांमधील उद्दिष्ट्य पार करण्यास मदत होणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. चंद्रावर भारतीयांचे स्थलांतर, चंद्रावरून नमुने परत करणे, भारतीय स्पेस स्टेशनची (बीएएस) उभारणी आणि ऑपरेशन इत्यादी भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान भारतासाठी फायद्याचे ठरणार आहे. सामान्य मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक रॉकेट प्रक्षेपण आवश्यक असताना अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञान आवश्यक आहे. या मोहिमेतील यशस्वी कामगिरीमुळे भारत अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा देश बनला आहे.