Indian ice creams in TasteAtlas
पुढारी ऑनलाईन डेस्क- भारतीय आईस्क्रीम्सना जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून, TasteAtlas या आंतरराष्ट्रीय खाद्य व प्रवास मार्गदर्शक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या 'जगातील टॉप 100 आईस्क्रीम' यादीत भारतातील पाच आईस्क्रीम्सचा समावेश केला आहे. मुंबईपासून मंगळुरूपर्यंत पसरलेली ही आईस्क्रीम्स भारताच्या विविधतेने परिपूर्ण खाद्यसंस्कृतीचं सुंदर दर्शनच घडवत आहेत.
ही मान्यता केवळ चविष्टतेची नव्हे, तर पारंपरिक आणि स्थानिक चवींमध्ये रुजलेल्या भारतीय कल्पकतेची जागतिक स्तरावर घेतलेली दखल आहे. TasteAtlas च्या यादीत स्थान मिळवलेली भारतातील पाच खास आईस्क्रीम्स कोणती आहेत, जाणून घेऊया...
मुंबईतील चर्चगेट परिसरातील ‘रुस्तम अॅन्ड कंपनी’ 1953 पासून लोकप्रिय असून, त्यांचं खास आइसक्रीम सँडविच TasteAtlas च्या यादीत झळकलं आहे.
कुरकुरीत वेफरमध्ये ठेवलेली घट्ट आइसक्रीम स्लाइस – हे सँडविच खासकरून आंबा फ्लेवरमध्ये खूप लोकप्रिय आहे. K. Rustom & Co. चे हे आंबा सँडविच जागतिक यादीत 24 व्या क्रमांकावर आहे
पत्ता: 87 स्टेडियम हाऊस, वीर नरिमन रोड, चर्चगेट, मुंबई.
बेंगळुरूमधील 'कॉर्नर हाऊस' ही डेझर्ट प्रेमींसाठी खास जागा. 1982 पासून प्रसिद्ध असलेलं यांचं ‘Death by Chocolate’ हे आइसक्रीम सुंदे – ज्यामध्ये चॉकलेट केक, आइसक्रीम, सॉस, नट्स आणि चेरी यांचं परिपूर्ण मिश्रण आहे – हे चॉकलेटप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. Corner House चे Death by Chocolate लगेच यादीत 60 व्या स्थानी
पत्ता: सेंट मार्क्स रोड, बेंगळुरू.
1984 साली सुरू झालेलं 'नॅचरल्स' आज भारतभर प्रसिद्ध आहे. कोणतेही कृत्रिम रंग किंवा फ्लेवर्स न वापरता बनवलेली ही आईस्क्रीम्स आरोग्यदृष्ट्या देखील उत्तम आहेत.
यामध्ये 'Tender Coconut' हे फ्लेवर खासकरून लोकप्रिय आहे – खरं नारळ वापरून तयार केलेलं हे थंड व कोमल आईस्क्रीम समुद्रकिनाऱ्याच्या आठवणी जागवते. Natural’s Tender Coconut ने जागतिक यादीत 38 वा क्रमांक मिळवला आहे.
उपलब्धता: संपूर्ण भारतभर आउटलेट्स.
1971 मध्ये मुंबईत सुरू झालेली ‘अप्सरा आईसक्रीम’ त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि देशी फ्लेवर्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यातील सर्वात लोकप्रिय फ्लेवर म्हणजे ‘ग्वावा किंवा पेरू’ – यात खरे पेरूचे तुकडे आणि किंचित तिखटपणाचा स्पर्श असतो, जो रस्त्यावरील गाडीवर मिळणाऱ्या पेरूवर चटणी शिंपडल्यासारखा लागतो. Apsara चे Guava Ice Cream यादीत 91 व्या स्थानी आहे
पत्ता: वॉलेश्वर रोड, मलबार हिल, मुंबई.
1975 पासून मंगळुरूमधील 'पब्बाज' त्यांच्या 'गडबड' आईस्क्रीमसाठी प्रसिद्ध आहे. विविध फ्लेवर्सचं आईस्क्रीम, जेली, ताजी फळं, सुका मेवा यांचे थर मिसळलेलं हे गडबड आईस्क्रीम चव, रंग आणि अनुभवाने भरलेलं आहे.
Pabba’s Gadbad ने टेस्ट अॅटलासच्या यादीत 7वे स्थान मिळवले आहे. जगातील टॉप 10 आईस्क्रीम्स मध्ये स्थान मिळवणारे हे एकमेव भारतीय आईस्क्रीम आहे.
पत्ता: पब्बाज, मंगळुरू.
एकंदरीत भारतीय आईस्क्रीम्स आता फक्त स्थानिक बाजारापुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर जागतिक व्यासपीठावरसुद्धा त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. ही यादी केवळ चविष्टतेची ओळख नाही, तर आपल्या परंपरेतील आहारसंस्कृतीचा अभिमानही आहे.
Gelateria Vivoli – Crema (Florence, Italy)
Gelateria Badiani – Buontalenti (Florence, Italy)
Gelateria la Carraia – Ricotta & Pear (Florence, Italy)
Frigidarium – Caramel/Gianduia (Rome, Italy)
Giolitti – Rice flavor (Rome, Italy)
Papagiorgis – Dark Chocolate (Corfu, Greece)
Pabba’s Gadbad (Mangaluru, India)
Gelarto Rosa – White Chocolate Lavender (Budapest, Hungary)