पुढारी ऑनलाईन डेस्क : आग्रामध्ये अंगाचा थरकाप उडविणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या सुनेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सासऱ्याने आपल्या पोटच्या मुलाच्या छातीत धारदार शस्राने घाव करून निर्घृणपणे खून केला. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे त्याने मुलाने जीवन संपविल्याचा बनाव करत हा खून पचविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पोस्टमार्टम रिपोर्ट व काही पुराव्याच्या आधारे त्याला ताब्यात घेतले.
ही घटना १४ मार्च रोजी आग्राच्या लधमदा (जगदीशपुरा) गावात घडली होती. अखेर चार महिन्यानंतर निर्दयी बापाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पुष्पेंद्र चौहान असे खून झालेल्या मुलाचे नाव असून याप्रकरणी चरण सिंह याला पोलिसांनी अटक केली.
बापाची आपल्या पत्नीवर वाईट नजर असल्याचे निदर्शनास आल्याने पुष्पेंद्रचे चरणसिंहबरोबर जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर त्याने घर सोडले व आपल्या पत्नीबरोबर मथुरा येथे राहू लागला. होळीच्या दिवशी तो एकटाच आपल्या गावी आला होता. यावेळी बापाने सुनेला बरोबर का आणले नाहीस? म्हणून त्याच्याशी वाद घातला. मुलाने त्याला शिवीगाळ केल्याने त्याने शांत डोक्याने मुलाच्या हत्येचा कट रचून मुलाला दारू पाजली. व मद्यधुंद अवस्थेत त्याच्या छातीवर धारदार शस्राने घाव करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने चालाखीने मुलाच्या जखमेच्या आत जीवंत काडतूस ठेवत मुलाच्या हातात पिस्तूल ठेवत स्वत :वर गोळी झाडून घेत मुलाने जीवन संपविल्याचा बनाव रचला.
पोलिस तपासादरम्यान चौकशी सुरू असताना पुष्पेंद्रचा बापाबरोबर वाद झाला होता. त्यानंतर त्याने वेगळे राहण्याचे ठरविल्याचे तपासादरम्यान उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी चरणसिंह याची चौकशी केली असता त्याने थातूरमातूर उत्तरे दिली. यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पुष्पेंद्रचा पोस्टमार्टम रिपोर्ट मागविला असता त्यामध्ये पुष्पेंद्रच्या छातीवर दोन सेंटीमीटरचा घाव असल्याची माहिती समोर आली. हा घाव गोळी झाडून घेतल्यामुळे नसावा, अशी माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चरणसिंह याला ताब्यात घेत त्याला पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर त्याने सुनेवर जीव जडल्याने आपण मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.