father beats child to death
गुरुगाव: १ ते ५० पर्यंतचे अंक नीट लिहिता आले नाहीत या शुल्लक कारणावरून एका साडेचार वर्षांच्या मुलीची तिच्या जन्मदात्या पित्याने लाटण्याने बेदम मारहाण करून आणि जमिनीवर आपटून हत्या केली. कृष्णा जैस्वाल (वय ३१) याला त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर शुक्रवारी अटक करण्यात आली. ही घटना बुधवारी फरिदाबादमधील झाडसेंतली येथील एका भाड्याच्या घरात घडली.
मूळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील हे दांम्पत्य झाडसेंतली येथे स्थायिक झाले आहे. पती-पत्नी एका खासगी कंपनीत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. आई दिवसा कामावर जाते, तर वडील रात्रीच्या शिफ्टला जात असल्याने दिवसा मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरी असायचे. मृत मुलगी वंशिका ही अजून शाळेत जात नव्हती, तिचे वडीलच तिला घरी शिकवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते ५० पर्यंतचे अंक नीट लिहिता आले नसल्याने मुलगी वंशिकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी जैस्वालने तिला रुग्णालयात नेले. "मुलगी खेळताना पायऱ्यांवरून पडली," अशी खोटी माहिती त्याने आपली पत्नी रंजिता आणि डॉक्टरांना दिली.
मात्र, या जोडप्याला आणखी दोन मुले असून ती घटनेच्या वेळी घरीच होती. सात वर्षांच्या मुलाने आपल्या बहिणीला वडिलांनी कशा प्रकारे मारले, हे आईला सांगितले. रंजिताला मुलीच्या अंगावर जखमांच्या खुणाही आढळल्या, त्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. जैस्वालने डॉक्टरांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
फरिदाबादच्या सेक्टर ५८ पोलीस ठाण्यात जैस्वालविरुद्ध बीएनएस कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.