Falta re-polls jahangir khan withdraws : तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी पश्चिम बंगालमधील पुन्हा मतदान होत असलेल्या फलता येथील मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्जच मागे घेतला आहे. तृणमूल काँग्रेस प्रवक्ते अरूप चक्रवर्ती यांनी सांगितलं की, पक्षाला खान यांच्या निर्णयाची माहिती मिळाली आहे. मात्र या निर्णयामागचे कारण अजून समजलेले नाही असे सांगितलं.
पत्रकारांशी बोलताना चक्रवर्ती म्हणाले, 'आम्ही जहांगीर खान यांनी फलता निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचं ऐकलं. आम्हाला अजूनही त्यांच्या माघारीचे कारण समजले नाही.
मात्र नंतर खुद्द जहांगीर खानने मतदार संघाच्या विकासासाठी पुरेसा निधी देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिल्याने आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने फलता येथील विधानसभा निवडणूक मतदानावेळी गोंधळ झाल्याचे आणि लोकशाही प्रक्रिया पाळली नसल्याचा आरोप करत निवडणूक रद्द केली होती. फलता यथील संपूर्ण २८५ मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द कऱण्यात आळी होती.
त्यानंतर फलता येथे २१ मे रोजी पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याचा निर्णय घोषित करण्यात आला होता. याची मतमोजणी २४ मे रोजी होणार आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीवेळी फलता येथील अनेक मतदान केंद्रांवरील इव्हीएम मशीनवरील काही बटन हे चिकटपट्टी लावून झाकले असल्याचे समोर आले होते. मतदान केंद्रामध्ये अनधिकृत व्यक्ती देखील घुसत असल्याचे दिसत होते. तो इतर व्यक्तींच्या वतीने मतदान करतोय असं देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता.
तत्पूर्वी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी जहांगीर यांच्यावर टीका करत त्यांची तुलना पुष्पा चित्रपटातील चंदन तस्कर पुष्पा या व्यक्तीरेखेशी केली होती. ते म्हणाले होते, 'कुठे आहे तो पुष्पा डाकू? तो आता कुठं दिसत नाहीये. २०२१ मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार हक्क समितीने १९ लोकांना कुख्यात गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. जहांगीर हा त्यातीलच एक आहे. त्याला माझ्यावर सोडून द्या. मी त्याची व्यवस्थित काळजी घेतो.'
या रॅलीनंतर पोलिसांनी जहांगीरचा जवळचा व्यक्ती आणि तृणमूल काँग्रेसचा फलता उपाध्यक्ष सैदुल खानला अटक केली. त्याच्यावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आणि अनेक इतर आरोप ठेवण्यात आले आहेत. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २०७ जागा जिंकल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेसची १५ वर्षाची सत्ता उलथवून लावत सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री झालेत. तृणमूलला फक्त ८० जागा जिंकता आल्या आहेत.