देशभरात बनावट कीटकनाशकांचा सुळसुळाट करत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड करत तेलंगणा पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. या कारवाईत राजू चेचानी म्हणून ओळखला जाणारा राजेंद्र चेचानी याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बनावट कृषी रसायने जप्त करण्यात आली आहेत.
२ मे २०२५ रोजी राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यातील बस्सी गावातील एका फार्महाऊसवर छापा टाकून स्थानिक पोलिसांच्या मदतीने चेचानीला अटक करण्यात आली. ही कारवाई ‘महेश्वरी सीड्स अॅण्ड पेस्टिसाईड्स’ या नावाने सुरू असलेल्या त्याच्या दुकानावरही केंद्रित होती. या ठिकाणी नियमभंग करत पॅकेजिंग मटेरिअल आणि बनावट उत्पादने साठवली जात होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ही अटक जुलै २०२४ मध्ये तेलंगणातील हैदराबादमध्ये ई. राजेशच्या गोदामात सापडलेल्या बनावट कीटकनाशक प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणी एलबी नगर पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ८३१/२०२४ अंतर्गत गुन्हा दाखल होता. त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपास पुढे नेऊन चेचानीच्या मुसक्या आवळल्या.
चेचानीवर सात वर्षांपासून अधिक काळ बनावट कीटकनाशकांचा उत्पादन आणि वितरणाचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे गंभीर आरोप आहेत. तो देशभरातील ११ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या बनावट उत्पादनांचे जाळे चालवत होता. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये त्याचे नेटवर्क सक्रिय होते.
ही बनावट उत्पादने नामांकित कृषी रसायन कंपन्यांची नक्कल करत तयार केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी वाटून त्यांचा वापर होत होता. मात्र या रसायनांतील घातक घटकांमुळे पिकांचे नुकसान होत होते आणि उत्पादनात मोठी घट होत होती.
या अटकेमुळे देशभरातील बनावट कीटकनाशकांच्या रॅकेटला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या अधिक तपासात चेचानीविरोधात इतर राज्यांमध्ये दाखल असलेले अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत.