नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे कच्चेतेल आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा घटला आहे. त्यामुळे गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी युरोपियन युनियनने (ईयू) २७ सदस्य देशांना नैसर्गिक वायूचा राखीव साठा कमी करण्याचे व राखीव साठ्यात हळूहळू वाढ करण्याचे आवाहन केले आहे.
ईयूचे ऊर्जा आयुक्त डॅन जॉर्गेनसेन यांनी सदस्य राष्ट्रांना त्यांच्या गॅस साठवणूक साठा क्षमतेच्या ८० पर्यंत कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रमाण युरोपियन युनियनच्या अधिकृत उद्दिष्टाच्या १० टक्क्यांनी कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या दरांना आळा बसावा यासाठी युरोपियन युनियनने हे पाऊल उचलले आहे. इराण आणि इस्रायलने मध्य-पूर्वेतील काही सर्वात महत्त्वाच्या गॅस प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे गुरुवारी युरोपमध्ये गॅसच्या किमती ३५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. युद्धामुळे गॅस प्रकल्पांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी अनेक वर्षे लागण्याची शक्यता आहे.
युरोपियन युनियनचा ऊर्जा पुरवठा तुलनात्मकदृष्ट्या संरक्षित असल्याचे जॉर्गेनसेन यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी संघर्षाला सामूहिक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. युद्धामुळे निर्माण झालेल्या प्रश्नामुळे द्रवरूप नैसर्गिक वायूचे उत्पादन युद्धापूर्वीच्या पातळीवर येण्यास अधिक वेळ लागू शकतो असा इशारा इंधन बाजार विश्लेषकांनी दिला आहे. गॅस साठवणुकीमुळे युरोपला हिवाळ्यातील उष्णता आणि विजेची मागणी पूर्ण करता येते.
त्यामुळे या प्रदेशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत होते. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात रशियन इंधनाची खरेदी थांबविण्याच्या नियमातही शिथिलता देण्यात येणार आहे. त्यात लवचिकता आणण्याचे सूतोवाचही युरोपियन युनियनने केले आहे. तर, अमेरिकेने यापूर्वीच रशियन तेलावरील निर्बंधास ३० दिवसांची स्थगिती दिली आहे.