Ethanol Blending Petrol Pudhari
राष्ट्रीय

E20 fuel mileage drop : इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होते! केंद्र सरकारची कबुली

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात पर्यावरणपूरक इंधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-२० (२० टक्के इथेनॉलमिश्रित) पेट्रोलचा वापर वाढवला जात आहे. मात्र, या इंधनामुळे वाहनांच्या मायलेजवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी कबुली केंद्र सरकारने पहिल्यांदाच दिली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, मायलेजमधील ही घट अत्यंत किंचित असेल आणि ती केवळ इथेनॉलमुळेच नाही, तर इतर अनेक घटकांवरही अवलंबून असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

हरदीपसिंह पुरी यांनी मायलेज कमी होण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, इथेनॉलचा वापर आता रेसिंग कार्समध्येही मोठ्या प्रमाणावर केला जातो, हे आता सिद्ध झाले आहे. यामुळे वाहनाचे ऑक्सिलेशन (पिक-अप) सुधारते आणि इंजिनमधील 'नॉकिंग'ची (खडखडाट) समस्याही कमी होते. त्यामुळे मायलेजमध्ये जर थोडी घट झाली, तर त्याला कारमधील इतर तांत्रिक गोष्टी किंवा ड्रायव्हिंगची पद्धत यासारखे इतर अनेक घटक कारणीभूत असू शकतात. वाहन उत्पादक संघटना आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यासारख्या सर्वसंबंधित संस्थांशी चर्चा करूनच ई-२० पेट्रोल बाजारात आणले गेल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यातील नियोजन आणि इतर तंत्रज्ञान

भारतातील वाढती बाजारपेठ पाहता सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाला येथे वाव आहे. देशात इलेक्ट्रिक वाहने, सीएनजी, हायब्रिड आणि बायोफ्युएल वाहने एकत्र चालू शकतात. सरकारने २२ टक्के ते ३० टक्क्यांपर्यंतच्या इथेनॉल मिश्रणासाठी मानके निश्चित केली असून त्यांना उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. मात्र, याचा अर्थ लगेच जास्त मिश्रणाचे पेट्रोल बाजारात येईल असा नाही, तर सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच पुढील पाऊल उचलले जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • मायलेजवर किंचित परिणाम : ई-२० पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते; परंतु यामुळे गाडीचा पिक-अप आणि इंजिनची क्षमता अधिक सुधारते.

  • विम्याची पूर्ण सुरक्षा : ई-२० पेट्रोल वापरल्यास वाहनांचा विमा रद्द होईल किंवा विमा कंपन्या क्लेम देणार नाहीत, अशा अफवा सध्या सोशल मीडियावर आहेत. मात्र, इथेनॉलमिश्रित इंधनाचा वाहनांच्या इन्शुरन्सवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असे विमा कंपन्यांनी स्पष्ट केल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले.

  • सर्व चाचण्यांनंतरच पुढील निर्णय : पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय सर्व आवश्यक आणि कठोर तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल.

  • पर्यावरणपूरक पाऊल : इथेनॉल मिश्रण ही एक वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि पर्यावरणाला पूरक अशी मोहीम असून यामुळे देशाचे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT