DSP Kalpana Verma file photo
राष्ट्रीय

DSP Kalpana Verma: लक्झरी कार, हिऱ्याची अंगठी अन् नुसता पैसा; उद्योगपतीला २.५ कोटींना लुटणारी महिला DSP निलंबित

DSP love trap case: एका उद्योगपतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुमारे २.५ कोटी रुपये हडपल्याच्या आरोपावरून सरकारने डीएसपी कल्पना वर्मा यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

मोहन कारंडे

DSP Kalpana Verma

रायपूर: एका बड्या उद्योगपतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुमारे २.५ कोटी रुपये हडपल्याच्या आरोपावरून छत्तीसगड सरकारने दंतेवाडा येथे तैनात असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. केवळ आर्थिक लूटच नाही, तर व्हॉट्सॲप चॅटद्वारे पोलिसांची अत्यंत गोपनीय माहिती लीक केल्याचा गंभीर ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

रायपूर येथील उद्योगपती दीपक टंडन यांनी डीएसपी कल्पना वर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. टंडन यांच्या तक्रारीनुसार, २०२१ पासून कल्पना वर्मा यांनी त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि ब्लॅकमेल करून सुमारे २.५ कोटींची मालमत्ता उकळली. यामध्ये २ कोटी रुपये रोख, एक आलिशान कार, १२ लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी आणि ५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. आपल्या भावाच्या नावावर हॉटेल सुरू करण्यासाठीही वर्माने मोठी रक्कम घेतल्याचे टंडन यांनी तक्रारीत म्हटले आहे.

१४७५ पानांचा चौकशी अहवाल

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत सुमारे १४७५ पानांचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. तपासादरम्यान पोलीस अधिकारी आणि उद्योगपती यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमध्ये मोठे विरोधाभास आढळले. विशेष म्हणजे, या चॅट्समध्ये विभागाची अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती शेअर केल्याचे समोर आले असून, हे सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर मानले जात आहे.

निलंबनाचे आदेश जारी

गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार, कल्पना वर्मा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अवैध आर्थिक लाभ मिळवला आणि बेहिशोबी मालमत्ता जमा केली. हे कृत्य 'छत्तीसगड नागरी सेवा आचरण नियम, १९६५' चे स्पष्ट उल्लंघन आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय नवा रायपूर येथील पोलीस मुख्यालय असेल. या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्या भावाविरुद्ध आणि आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT