Delhi Audi Accident drunk and drive 5
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका मद्यधुंद चालकाने मध्यरात्री आपल्या ऑडी गाडीने फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांवर गाडी घालून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या भीषण अपघातात एका आठ वर्षांच्या मुलीसह दोन जोडप्यांचा समावेश असून सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली आहे.
ही घटना 9 जुलैच्या रात्री 1:45 वाजता वसंत विहार येथील शिवा कॅम्पच्या समोरील फुटपाथवर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी पाचही जण रस्त्याच्या कडेला झोपलेले होते.
चालक उत्सव शेखर (वय 40, रहिवासी द्वारका, दिल्ली) याने आपल्या ऑडी गाडीने अचानक रस्ता सोडून फुटपाथवर घुसून सर्वांवर गाडी घातली. अपघाताच्या वेळी उत्सव शेखर हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, हे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये पुढील पाच जणांचा समावेश आहे:
लाधी (40)
बिमला (8, लाधीची मुलगी)
सबामी उर्फ चिर्मा (45, लाधीचा पती)
रामचंद्र (45)
नारायणी (35, रामचंद्र यांची पत्नी)
हे सर्वजण राजस्थानमधून आलेले होते आणि उपजीविकेसाठी दिल्लीतील शिवा कॅम्प भागात वास्तव्यास होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक पांढऱ्या रंगाची ऑडी कार झोपलेल्या लोकांवर चढवण्यात आली होती.
या घटनेचा प्राथमिक तपास व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी अतिवेगात होती. पोलिसांनी घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासत तपास सुरू ठेवला आहे.
दिल्लीत अपघातानंतर चालकावर गंभीर निष्काळजीपणाने वाहन चालवणे, जखमी करण्याचा प्रयत्न, आणि दारू पिऊन वाहन चालवणे अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, पुढील चौकशी सुरू आहे.
ही घटना एकटीच नाही. देशात दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात घडवण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. 12 जुलै रोजी मुंबईतील वरळीमध्ये एका दारू पिऊन दुचाकी चालवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने 75 वर्षांच्या वृद्धाला धडक दिली होती.
गेल्या महिन्यात गुरगावजवळ एक ह्युंदाई क्रेटा चालकाने नशेत ई-रिक्शाला धडक दिली होती, ज्यात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले होते.
ही घटना शहरातील गरीब व दुर्बल घटकांवरील वाढत्या अपघातांचे प्रतिक बनली असून, रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.