Assam doctor gym video File Photo
राष्ट्रीय

Doctor gym video: व्यायाम करताना अचानक कोसळले अन्...; जिममध्ये डॉक्टरचा 'कार्डियाक अरेस्ट'ने मृत्यू, व्हिडिओ समोर

Assam doctor gym video: जिममध्ये व्यायाम करत असताना एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Assam doctor gym video

गुवाहाटी: जिममध्ये व्यायाम करत असताना एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. आसाममधील नौगाव येथे ही घटना घडली. डॉ. शाहीन रहमान असे त्याचे नाव असून मृत्यूचे कारण 'कार्डियाक अरेस्ट' असल्याचे सांगितले जात आहे.

नेहमीप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी डॉ. शाहीन जिममध्ये व्यायामासाठी गेले होते. गुडघ्यावर बसून व्यायाम करत असतानाच ते अचानक तोंडावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, डॉ. शाहीन यांच्यासोबत इतरही काही जण जिममध्ये व्यायाम करत होते, त्याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली.

मेडिकल कॉलेजमध्ये होते असिस्टंट प्रोफेसर

प्राथमिक माहितीनुसार, डॉ. शाहीन यांच्या मृत्यूचे कारण 'कार्डियाक अरेस्ट' असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल आलेला नाही. डॉ. रहमान हे 'नागाव मेडिकल कॉलेज'मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.

हृदयरोग अन् अचानक मृत्यूची वाढती चिंता

गेल्या काही वर्षांपासून खेळताना, डान्स करताना, चालताना किंवा अगदी बोलताना अचानक लोकांचा मृत्यू होत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. पूर्वी केवळ ५० ते ६० वयोगटातील व्यक्तींनाच हृदयविकाराचा त्रास होतो असा समज होता, परंतु आता अगदी ९ ते १० वर्षांची लहान मुलेही याच्या विळख्यात सापडत आहेत. या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी तरुणांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकाराची काही प्रमुख कारणे सांगितली आहेत.

तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय?

सध्याच्या काळात केवळ ज्येष्ठांनाच नाही, तर तरुणांनाही हृदयविकाराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठी खालील घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहेत:

धूम्रपान आणि व्हेपिंगची सवय

अतिप्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन

हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित जन्मजात समस्या

अनुवांशिकता (कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असणे)

बिघडलेली जीवनशैली आणि मानसिक ताणतणाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT