नवी दिल्ली ः वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपात, स्वदेशीचा नारा, यामुळे यंदाच्या दिवाळीतील वस्तू आणि सेवांची विक्री तब्बल 6.05 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. द कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) मंगळवारी (दि. 21) ही माहिती दिली.
गतवर्षी दिवाळीच्या कालावधीत 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा उत्सवातील उलाढालीचा विक्रम झाल्याचे व्यापारी संघटनेने सांगितले. या विक्रीत वस्तूंचा वाटा 5.40 लाख कोटी रुपये असून, सेवांचा वाटा 65 हजार कोटी रुपये आहे. स्वदेशी दिवाळी आणि व्होकल फॉर लोकल या घोषणांमुळे एकूण विक्रीत स्वदेशीचा वाटा 87 टक्क्यांवर गेला. दिवाळीमुळे वाहतूक, गोदाम, पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री क्षेत्रात तात्पुरते 50 लाख रोजगार निर्माण झाले.
दैनंदिन वापराच्या वस्तू विक्रीत मोठी वाढ
यंदाच्या दिवाळीत फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्राचा एकूण विक्रीतील वाटा 12 टक्के आहे. खालोखाल सराफी बाजाराचा वाटा 10 टक्के असून, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्सचा वाटा 8 टक्के आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स, तयार कपडे, भेटवस्तूंचा वाटा 7 टक्के आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी झाल्याने विक्रीत मोठी वाढ झाल्याचे निरीक्षणही व्यापारी संघटनेने व्यक्त केला. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी 18 वरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. व्यावसायिक विश्वास निर्देशांक दहापैकी 8.6 टक्के उच्चांकवर गेला असून, ग््रााहक विश्वास निर्देशांकाने 8.4 टक्क्यांची पातळी गाठल्याचे संघटनेने सांगितले.