

नवी दिल्ली : आगामी मार्च महिन्यापर्यंत नक्षलवादाची समस्या संपणार, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले. दीर्घकाळापासून नक्षलवाद देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने एक आव्हान होते. पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या एकत्रित आणि संघटित प्रयत्नांमुळे ही समस्या संपत आहे. त्यामुळे नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
पोलीस स्मृतीदिनानिमित्त, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथील कार्यक्रमाला संबोधित करत होते. १९५९ साली २१ ऑक्टोबर रोजी १० शूर पोलीस कर्मचाऱ्यांनी लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथे चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात प्राण गमावले होते. त्यांना संरक्षणमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
सशस्त्र दले आणि पोलीस राष्ट्रीय सुरक्षेचे स्तंभ असल्याचे आहेत, असे ते म्हणाले. सशस्त्र दल देशाचे आणि देशाच्या एकात्मतेचे रक्षण करतात, तर पोलीस दल समाज आणि सामाजिक एकात्मतेचे रक्षण करतात. लष्कर आणि पोलीस वेगवेगळ्या स्तरांवर काम करतात पण त्यांचे ध्येय एकच असते- राष्ट्राचे संरक्षण. २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत असताना, देशाच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेचे संतुलन राखणे पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. आपल्या सतर्क सशस्त्र दलांवरील आणि पोलिसांवरील विश्वासामुळेच आज नागरिक शांतपणे झोपतात. हा आत्मविश्वास आपल्या देशाच्या स्थिरतेचा पाया आहे,असे ते म्हणाले.