

ठळक मुद्दे
दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी झाल्यामुळे राजधानी नवी दिल्लीतील वायू प्रदूषण 'गंभीर' श्रेणीत पोहोचले.
सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीकडे दुर्लक्ष करत दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले.
दिवाळीनंतर दोन दिवसांनीही दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३४२ पर्यंत असून हवा 'अत्यंत खराब' आहे.
या गंभीर प्रदूषणामुळे दिल्लीची हवा 'श्वास घेण्यास अयोग्य' झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नवी दिल्ली: दिवाळीच्या दिवशी राजधानी नवी दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दिल्लीकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे हवेची गुणवत्ता (AQI) गंभीर श्रेणीत नोंदवली गेली आहे.
प्रदूषणाची आकडेवारी
दिल्लीच्या विविध भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) गंभीर श्रेणीत नोंदवला गेला. अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता 400 पेक्षा जास्त नोंदवली गेली, तर जवळपास सर्वच भागांत स्थिती गंभीर असल्याची आकडेवारी आहे. आजही, दिवाळीच्या दोन दिवसांनंतरही राजधानी नवी दिल्लीतील हवा 'अत्यंत खराब' श्रेणीतच आहे. दिल्लीतील आजचा सरासरी AQI सध्या 342 पर्यंत आहे, ज्यामुळे दिल्लीकरांना मोकळा श्वास घेणेही कठीण झाले आहे.
कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यावर बंदी घातली असतानाही दिल्लीकरांनी त्या निर्णयाचे पालन केले नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या गंभीर प्रदूषणामुळे देशाची राजधानी दिल्लीतील हवा सध्या श्वास घेण्यास अयोग्य असल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. खराब हवेमुळे दिल्लीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दिल्लीतील हवामान विभागाचा हवेचा निर्देशांक दाखवणारे बोर्ड बंद
देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता (AQI) सध्या अत्यंत खराब झाली असून, आजचा सरासरी AQI सुमारे 342 पर्यंत पोहोचला आहे. आनंद विहार (355), बवाना (376) आणि अशोक विहार (377) सारखी अनेक क्षेत्रे रेड झोनमध्ये आहेत, ज्यामुळे दिल्लीकरांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हवा श्वास घेण्यासाठी अयोग्य ठरत असताना, हवामान विभागाकडून हवेचा निर्देशांक दाखवणारे अनेक बोर्ड मात्र बंद असल्याचे चित्र आहे.
एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) नुसार हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण:
0 ते 50 : उत्तम हवा
51 ते 100 : चांगली हवा
101 ते 200 : मध्यम हवा
201 ते 300 : खराब हवामान
301 ते 400 हवा : अत्यंत खराब
400 ते 500 च्या वर : मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक (गंभीर)