Diwali Firecracker Tragedy pudhari
राष्ट्रीय

Diwali Firecracker Tragedy: स्काय शॉट पेटलाच नाही म्हणून शेजारी दुसरा फटाका लावायला गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

फटाके फोडताना १४ वर्षाच्या साकित मित्तल उर्फ गगनचा मृत्यू झाला आहे.

Anirudha Sankpal

Diwali Firecracker Tragedy: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन दिव्यांचा हा सण आनंदाने साजरा करत असतात. यावेळी फटाके देखील फोडले जातात. मात्र फटाके फोडताना अनेकवेळा काही दुर्दैवी घटना घडते. अशीच एक दुर्दैवी घटना अकालगढ गावात घडली आहे. फटाके फोडताना १४ वर्षाच्या साकित मित्तल उर्फ गगनचा मृत्यू झाला आहे.

दुर्दैवी घटना

या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरात आक्रोश सुरू झाला. सणाचा आनंद क्षणात शोककळेत बदलला. साकितने फटाके फोडताना मल्टी कलर स्काय शॉट लावला होता. मात्र तो फटाका पेटला नाही. त्यानंतर साकित त्याच्या शेजारी दुसरा फटाका लावण्यासाठी गेला. याचवेळी पहिला स्कायशॉटमध्ये मोठा स्फोट झाला. साकेत यावेळी या फटाक्याच्या जवळच वाकून दुसरा फटाका लावत होता. तेवढ्यात फटाक्याचा स्फोट झाल्याने त्याच्या गळ्याजवळ गंभीर जखम निर्माण झाली.

आनंदाचे वातावरण शोककळेत रूपांतरित

कुटुंबीयांनी त्याला त्वरित खासगी रूग्णालयात दाखल केलं. तिथं शल्यचिकित्सक सरबजीत सिंह यांनी साकितला मृत घोषित केलं. साकित हा अकालगढमधील उद्योगपती आणि आरती स्टोअरचे मालक सुरेश कुमार मित्तल यांचा एकुलता एक मुलगा होता.

कुटुंबीय पूजा करण्यासाठी साकित यांचे काका राज कुमार मित्तल यांच्या नव्या घरी पोहचले होते. त्यावेळी दोन्ही कुटुंबीय मिळून सणाचा आनंद लुटत होते. पूजा झाल्यानंतर फटाके फोडताना ही दुःखद घटना घडली अन् आनंद शोककळेत बदलला.

दिवाळीच्या आतशबाजीत २२ लोकांचा मृत्यू

दिवाळीत आतशबाजी करताना आतापर्यंत आग लागून २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश मधील कटनी आणि सिवनी जिल्ह्यातील दोन उद्योगपतींच्या घरात आग लागल्याच्या वेगवगेळ्या दोन घटना घडल्या. त्यात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती हे व्यापारी घरातील सदस्य होते. त्यात महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे.

उत्तर प्रदेशात तीन मुलांचा मृत्यू झाला असून राजस्थानात दोन दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, बिहार आणि ओडिसा इथं एक एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. फक्त दिल्लीत फटाक्यांमुळे जवळपास ३०० लोक जखमी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT