Dimagi Naxal Party Pudhari
राष्ट्रीय

Dimagi Naxal Party : 'CJP'नंतर आता 'दिमागी नक्षल पार्टी'ची हवा! २४ तासांत १.६ लाख फॉलोअर्स; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यादिनाच्या भाषणात केला होता 'दिमागी नक्षल'चा उल्‍लेख

पुढारी वृत्तसेवा

Dimagi Naxal Party Instagram : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यादिनाच्या भाषणात 'दिमागी नक्षल' (बौद्धिक नक्षलवाद) या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर सोशल मीडियावर याचे मोठे पडसाद उमटत आहेत. इन्स्टाग्रामवर रातोरात तयार झालेल्या 'दिमागी नक्षल पार्टी' (Dimagi Naxal Party) नावाच्या अकाऊंटने अवघ्या २४ तासांत १.६ लाखांहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे.

अकाऊंटचा Username एकदा बदलला

इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, हे अकाऊंट याच महिन्यात सुरू करण्यात आले असून यापूर्वी त्याचा युझरनेम (Username) एकदा बदलण्यात आला आहे. सध्या या अकाऊंटवर ६२ पोस्ट्स असून ते ३५ जणांना फॉलो करत आहे. मात्र, हे अकाऊंट नक्की कोण चालवत आहे, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

काय म्‍हणाले होते पंतप्रधान मोदी?

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी माओवादाविरोधातील कारवाईचा उल्लेख करताना म्हटले होते, "आम्ही जंगलातील सशस्त्र नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले असून देशाला या संकटातून मुक्त केले आहे. मात्र, सशस्त्र नक्षलवादी गेले असले, तरी 'दिमागी नक्षल' अजूनही सक्रिय आहेत."

PM मोदींच्या वक्तव्यानंतर 'DNJP' नावाचे नवीन अकाऊंट

पंतप्रधानांच्या या विधानानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर 'दिमागी नक्षल जनता पार्टी' (@DNJP_India) नावाचे नवीन अकाऊंट तयार झाले. हे अकाऊंट सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, आपचे नेते अरविंद केजरीवाल, युट्युबर ध्रुव राठी, हास्यकलाकार कुणाल कामरा, अभिनेते प्रकाश राज आणि फॅक्ट-चेकर मोहम्मद झुबेर यांच्यासह १३ प्रमुख अकाऊंट्सना फॉलो करत आहे.

प्रकाश राज यांची पोस्ट रिट्विट; पी. चिदंबरम यांची प्रतिक्रिया

'दिमागी नक्षल जनता पार्टी' या अकाऊंटवरून अभिनेता प्रकाश राज यांची एक पोस्ट रिट्विट करण्यात आली आहे. यात प्रकाश राज यांनी लिहिले होते, "दिमागी बना.. मूर्ख बनू नका. प्रश्न विचारा.. गुलामगिरी करू नका." दरम्यान, पंतप्रधानांच्या विधानावरून राजकीय वाद पेटला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी, "मला 'दिमागी नक्षल' असल्याचा अभिमान आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

AI किरेन रिजिजू यांनी दिले होते स्पष्टीकरण

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, "पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेत्यांना थेट 'दिमागी नक्षल' म्हटलेले नाही. हा शब्द अशा लोकांसाठी वापरला गेला आहे जे माओवाद्यांचे समर्थन करतात, तसेच भारतीय संविधानाचा अनादर करतात, फुटीरतावाद्यांची बाजू घेतात किंवा ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून वेगळे करणाऱ्या 'चिकन नेक' भागाची नाकेबंदी करण्याचे समर्थन करतात."रिजिजू यांनी शरजील इमाम यांच्या 'चिकन नेक'बाबतच्या जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत, अशा विचारसरणीला पाठिंबा देणारे लोकच 'दिमागी नक्षल' असल्याचे म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT