संसदीय कामासाठी आता तयार होणार 'डिजिटल संसद' Pudhari File Photo
राष्ट्रीय

सर्व राज्यांच्या विधानसभा आणि संसदेचे कामकाज पाहण्यासाठी एकच डिजिटल व्यासपीठ होणार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात कुठेही बसून संसदेच्या किंवा कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या कामकाजाची माहिती मिळवता येणार आहे. त्यासाठी लोकसभा सचिवालय डिजिटल व्यासपीट तयार करत आहे. 'डिजिटल संसद' या नावाने तयार होत असलेल्या या व्यासपीठावर संसदेचे कामकाज तसेच राज्यांच्या विधानसभेचे कामकाज पाहता येणार आहे. यासाठी इतर कोणत्याही डिजिटल लिंकवर जाण्याची गरज भासणार नाही.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेसोबतच बहुतांश विधानसभांनी त्यांचे कामकाज पूर्णपणे डिजिटल केले आहे. हे डिजिटलायझेशन संसदेच्या डिजिटलायझेशनशी जोडले गेले आहे. यामुळे लोकांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळेल. संसदेचे लोकसभा सचिवालय यासाठी डिजिटल संसद तयार करत आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआयची) मदत घेतली जात आहे. त्यात अनेक राज्यांच्या विधानसभा जोडल्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

संसदेचे आणि विधानसभेचे कामकाज मराठीतही पाहायला मिळेल

डिजिटल संसदेवर तुम्हाला कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे कामकाज तुमच्या आवडीच्या भाषेत पाहायला मिळेल. त्यामुळे मराठीमध्ये हे कामकाज पाहायला मिळणार आहे. संसद असो वा विधानसभा, पीठासीन अधिकारी गदारोळामुळे चिंतेत राहतात. गदारोळामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होते आणि कामकाजावर परिणाम होतो. हे लोकप्रतिनिधींना समजेल, अशी आशा लोकसभा अध्यक्षांनी व्यक्त केली. यामुळे कोणाचाही हेतू साध्य होत नसल्याचे ते म्हणाले. पीठासीन अधिकाऱ्यांना सभागृहाचे कामकाज सन्मानाने, सभ्यतेने, भारतीय मूल्ये आणि मानकांनुसार चालवण्याची विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील बैठक सिडनीत

राष्ट्रकूल संसदीय मंडळाची पुढील बैठक सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे होणार आहे. ही बैठक यावर्षी ३ ते ८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यासाठी आठ विषयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण, लोकसहभाग, शाश्वत विकास हे विषय प्रमुख आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT