संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षासमोर मजबूत विरोधी पक्ष होता. त्यामुळे मागील दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने अधिवेशन सत्ताधार्यांना सोपे जात होते, त्या तुलनेत यावर्षी अधिवेशन सत्ताधार्यांना कठीण गेले. अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी खर्या अर्थाने समोरासमोर सभागृहात लढाई लढताना दिसत होते. या अधिवेशनामध्ये काही विधेयकेही मांडण्यात आली. या विधेयकांमध्येही सत्ताधार्यांवर असलेले विरोधकांचे वजन दिसून पडले. दरम्यान, पहिल्यांदा संसदेत आलेल्या खासदारांची संख्याही मोठी आहे. या नव्या खासदारांनीही आपापल्या परीने संसदीय कामकाजात भाग घेत विविध प्रश्न, मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. यात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नवे खासदार आघाडीवर होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी अर्थसंकल्पावर कडाडून टीका केली, तर भाजपसह एनडीएतील घटक पक्षांनी अर्थसंकल्पाचे जोरदार समर्थन केले. केंद्र सरकारला हवे असलेले वक्फ दुरुस्ती विधेयकही या अधिवेशनात आणले गेले, हे विधेयक मंजूर होईल असे वाटत होते; मात्र ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारद्वारे असे करण्याची ही पहिलीच वेळ होती.
18 व्या लोकसभेचे निकालच असे होते की, सत्ता भाजपप्रणित एनडीएकडे असेल; मात्र विरोधी पक्ष मजबूत असेल. त्यामुळे 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात ज्या पद्धतीने सरकारला स्वतंत्रपणे निर्णय घेण्यासाठी संधी होती, तशी संधी आता नसणार आहे. राज्यसभेमध्ये सत्ताधार्यांकडे बहुमत नाही, संख्याबळ नसल्यामुळे कुठलेही विधेयक मंजूर करून घेणे ही सत्ताधार्यांसाठी तारेवरची कसरत आहे. ही कसरत करताना विरोधी पक्षांसह एनडीएमध्ये असलेल्या घटक पक्षांचेही म्हणणे समजून घेणे सत्ताधार्यांसाठी अर्थात भाजपासाठी क्रमप्राप्त आहे, याचे चित्र अधिवेशनातही दिसून आले. राज्यसभेत सभापती आणि जया बच्चन यांच्यामधील खडाजंगीही चांगलीच रंगली. जया बच्चन यांचे नाव घेताना जया अमिताभ बच्चन असे नाव घेतले गेले. त्यावर जया बच्चन यांनी हरकत नोंदवत जया बच्चन म्हटले असते तरी चालले असते, असे म्हटले. त्यानंतर अधिवेशन आटोपले, त्या दिवशीही सभापती आणि जया बच्चन यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. या अधिवेशनातील आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे सोनिया गांधी आणि जया बच्चन यांच्यात झालेली भेट. गेले अनेक दिवस बच्चन आणि गांधी कुटुंब यांच्यात संवाद नाही, अशा चर्चा होत्या. मात्र, सोनिया गांधी आणि जया बच्चन यांच्या संवादाने याला पूर्णविराम मिळाला.
राहुल गांधींना विविध समाज घटक भेटायला आले. हे घटक येत असताना त्यांना संसदेत येऊ दिले जात नाही, त्यांना पासेस दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. काही घटकांना भेटायला, तर खुद्द राहुल गांधी स्वागत कक्षामध्ये आले. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. या सगळ्या घडामोडींमध्ये नव्या संसद भवनाचा मुद्दाही चर्चेत राहिला. नवे संसद भवन भव्य दिसत असले, तरी अनेक खासदारांना ते रुचलेले नाही, असे दिसते. नव्या संसद भवनात सेंट्रल हॉल नसणे ही एक मोठी अडचण आहे, असेही अनेक खासदारांना वाटते. यापूर्वीच्या अधिवेशनांमध्ये होत असलेल्या गप्पागोष्टी, चर्चा या अधिवेशनात झाल्या नाही.
अधिवेशनात विविध मुद्द्यांवर मंत्र्यांव्यतिरिक्त सत्ताधारी पक्षांकडून भाजप खासदार अनुराग ठाकूर, मेधा कुलकर्णी यांनी चांगली भाषणे केली, तर विरोधी पक्षांमध्ये लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, प्रणिती शिंदे, अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही जोरदार भाषणे केली.