Dhruv Rathee video case Pudhari
राष्ट्रीय

Dhruv Rathee video case : ध्रुव राठीचा 'राम-कृष्ण' संदर्भातील वादग्रस्त व्हिडिओ भारतात ब्लॉक; Googleची हायकोर्टात माहिती

केंद्र सरकारच्या 'तक्रार अपील समितीने' दिलेल्या आदेशानंतर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Dhruv Rathee video case : युट्यूबर ध्रुव राठी याच्या व्हिडिओमध्‍ये हिंदू देवी-देवतांविरोधात वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली होती. तो व्हिडिओ भारतात ब्लॉक करण्यात आला आहे, अशी माहिती आज (दि.११) गूगलच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात दिली. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

केंद्र सरकारच्या 'तक्रार अपील समितीने' दिलेल्या आदेशानंतर कारवाई

केंद्र सरकारच्या 'तक्रार अपील समितीने' (GAC) दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे गूगलच्या वकिलांनी स्पष्ट केले. ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह मजकुराबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणारी सरकारी समिती आहे. याचिकाकर्त्या अमिता सचदेवा यांच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती शर्मा यांनी जीएसीला १५ दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्या मुदतीत हा निर्णय घेण्यात आला.

परदेशासह VPN द्वारे व्हिडिओ अजूनही उपलब्ध: याचिकाकर्त्यांचा दावा

याचिकाकर्त्या अमिता सचदेवा यांनी न्यायालयात सांगितले की, हा व्हिडिओ भारतात ब्लॉक झाला असला तरी परदेशात आणि भारतामध्ये 'व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क'च्या मदतीने अजूनही पाहता येत आहे. त्यावर न्यायमूर्तींनी हा व्हिडिओ जगभरातून हटवण्याबाबत (ग्लोबल ब्लॉक) सूचना देण्याचे आदेश दिले. मात्र, कंटेंट जागतिक स्तरावर हटवण्याचा विषय उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठासमोर प्रलंबित असल्याचे गूगलच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले. तसेच इतर काही युट्यूबर्सनीही राठी यांचा हा व्हिडिओ अपलोड केल्याचे सचदेवा यांनी सांगत ते व्हिडिओही हटवण्याची मागणी केली. पण गूगलने याला विरोध करत त्यासाठी वेगळी याचिका दाखल करावी, असा युक्तिवाद केला.

तो आदेश सर्वत्र लागू झाला पाहिजे : अतिरिक्त सॉलिसिटर शर्मा

केंद्र सरकारतर्फे उपस्थित राहिलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायालयात सांगितले की, "एखाद्या व्हिडिओवर एकदा आक्षेप नोंदवून आदेश पारित झाला की तो आदेश सर्वत्र लागू झाला पाहिजे. यावर काही स्पष्ट निर्देश यायला हवेत, अन्यथा ही कधीही न संपणारी प्रक्रिया ठरेल."

काय आहे प्रकरण?

याचिकाकर्त्या सचदेवा यांनी याचिकेत आरोप केला होता की, ध्रुव राठी यांनी २१ मार्च रोजी एक आक्षेपार्ह आणि जातीयदृष्ट्या संवेदनशील व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि सीता देवी यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्ये करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे आणि युट्यूबकडेही तक्रार नोंदवून व्हिडिओ हटवण्याची मागणी करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT