राष्ट्रीय

Dhirendra Shastri : दुर्गापूजेदरम्यान मासे, मटण खाणारे लोक ‘पाखंडी’, धीरेंद्र शास्त्री यांचे वादग्रस्त वक्तव्‍य : प. बंगालमध्‍ये नवा वाद

काँग्रेसने केली तक्रार दाखल; मात्र भाजपने झटकले हात

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : दुर्गापूजा उत्सवाच्या तोंडावर बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी मांसाहाराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पश्चिम बंगालमध्ये नवा वाद पेटला आहे. दुर्गापूजेदरम्यान मासे किंवा मटण खाणारे लोक ‘पाखंडी’ असतात, असे वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी हावडा येथील कार्यक्रमात केले होते.

या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शास्त्री यांच्या विरोधात पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. काँग्रेसच्या दक्षिण कोलकाता आणि मध्य कोलकाता जिल्हा अध्यक्षांनी अनुक्रमे भवानीपूर पोलिस ठाण्यात आणि कोलकाता पोलिस आयुक्तांकडे ई-मेलद्वारे ही तक्रार नोंदवली आहे.

बंगालमधील दुर्गापूजा हा केवळ धार्मिक सण नसून एक सांस्कृतिक उत्सव आहे. दुर्गापूजेदरम्यान मासे किंवा मांसाहार करण्याची बंगालमध्ये शतकानुशतके जुनी परंपरा आहे. कोणतीही परप्रांतीय व्यक्ती येऊन बंगाली संस्कृती आणि आहाराच्या सवयींवर हुकूमशाही गाजवू शकत नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी ‘घाणेरडे अन्न’ आणि ‘पाखंडी’ यांसारख्या शब्दांचा वापर करून बंगाली अस्मितेचा आणि दुर्गापूजेच्या भावनांचा अनादर केला आहे. त्‍यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, असे तक्रारीत नमूद केले आहे.

भाजपनेही झटकले हात

धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानापासून पश्चिम बंगाल भाजपने अंतर राखले आहे. भाजप नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी स्पष्ट केले की, बंगालमध्ये काली पूजा आणि दुर्गापूजेदरम्यान बळी देण्याची आणि देवाला मासे-मटण नैवेद्य (प्रसाद) म्हणून दाखवण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे येथील परिस्थिती देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळी आहे.

टीएमसीकडून निषेध

दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही (टीएमसी) धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून, त्यांना राज्य अतिथीगृहात दिलेल्या भव्य स्वागतावरून भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT