

जळगाव : तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या कथित प्रकरणाचा तपास मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील नशिराबादपर्यंत पोहोचला. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई पश्चिम विभाग सायबर गुन्हे पोलिसांचे पथक नशिराबादमध्ये दाखल झाले. पथकाने नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याला जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी ताबा मिळविण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंटचा संशय चेन्नई सायबर पोलिसांच्या तपासानुसार, मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाने किंवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आल्याचा संशय आहे. या अकाउंटवरून एआयच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे आणि विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ही डिजिटल सामग्री नेमकी कोणी तयार केली, संबंधित अकाउंटचे संचालन कोण करत होते आणि त्याचा प्रसार कोणत्या माध्यमातून करण्यात आला, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी तमिळनाडूमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सचे आयपी लॉग, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील आणि वापरण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांची माहिती तपासली जात आहे.
अकाउंट कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणाद्वारे हाताळण्यात आले, त्यावरून किती डिजिटल सामग्री प्रसारित करण्यात आली, तसेच या सामग्रीच्या निर्मिती व प्रसारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
होमगार्डचा नेमका सहभाग काय?
नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख याचा या प्रकरणात नेमका सहभाग काय आहे, हे संबंधित अकाउंट त्याने तयार केले होते का, त्याचे संचालन केले होते का किंवा एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या डिजिटल सामग्रीच्या प्रसाराशी त्याचा काही संबंध होता का, या सर्व बाबींची चौकशी सायबर पोलिसांकडून केली जात आहे. तपासातून समोर येणारे डिजिटल पुरावे, तांत्रिक माहिती आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या आधारेच पुढील कारवाई निश्चित होणार आहे.
आणखी कोणाचा सहभाग?
चेन्नईतील सायबर गुन्हे पोलिसांचे पथक थेट नशिराबादमध्ये दाखल झाल्याने या प्रकरणाची स्थानिक पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. बनावट अकाउंटच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल सामग्री तयार करून ती प्रसारित करण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकरणात एकाच व्यक्तीचा सहभाग आहे की आणखी काही जण संबंधित आहेत, याचा उलगडा डिजिटल तपासातून होण्याची शक्यता आहे. जळगाव न्यायालयीन प्रक्रियेनंतर चेन्नई सायबर पोलिसांच्या पुढील तपासात कोणते डिजिटल पुरावे समोर येतात, याकडे आता लक्ष लागले आहे. चेन्नई पोलीस चेन्नईला सकाळी चेन्नईकडे होमगार्ड ला घेऊन रवाना होणार आहे.