Dharmendra Pradhan on NEET  Pudhari
राष्ट्रीय

Dharmendra Pradhan on NEET : "जंतरमंतरवर 'तुकडे तुकडे' गँग..." ; 'नीट'प्रश्‍नी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले?

पुढील वर्षापासून NEET परीक्षा संगणकावर आधारित घेण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

Dharmendra Pradhan on NEET : "ज्या लोकांना देशाचे टुकड़े करायचे आहेत, तेच लोक दिल्लीतील जंतरमंतरवर डफली वाजवत आहेत. तिथे एकतरी विद्यार्थी आहे का?", असा सवाल करत "विरोधी पक्षनेते म्हणून प्रश्न विचारण्याचा राहुल गांधी यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु, त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात विनाकारण भीती निर्माण करू नये," असे आवाहनही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.

'राहुल गांधींनी देशाची माफी मागावी'

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत प्रधान म्हणाले की, नागपूरच्या विद्यार्थ्याने स्वतः पोर्टलद्वारे अबुधाबी केंद्राची निवड केली होती. ही निवड सिस्टममध्ये अनेकदा रेकॉर्ड झाली होती. त्यानंतर एनटीएने (NTA) त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता आणि विद्यार्थ्याला नागपूरमधूनच परीक्षा देण्याची संधीही दिली होती. असे असूनही राहुल गांधींनी हा मुद्दा जाहीरपणे उपस्थित केला. राहुल गांधी यांनी या विषयावर एक मोठी पोस्ट लिहिली. "जर राहुल गांधी यांच्यात थोडीही नैतिकता आणि जबाबदारी शिल्लक असेल, तर त्यांनी देशासमोर माफी मागितली पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली.

राहुल गांधींचा देशाच्या यंत्रणेवर विश्वास नाही

"राहुल गांधी यांचा देशाच्या यंत्रणेवर विश्वास नाही. त्यांचा भारताच्या तरुणांवर विश्वास नाही. जर तरुणांचा त्यांच्यावर थोडासा तरी विश्वास असता, तर इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने NEET परीक्षेला बसले नसते," असेही ते म्हणाले.

पुढील वर्षापासून NEET परीक्षा संगणकावर आधारित घेण्याचे नियोजन

पेपरफुटीसारखे प्रकार रोखण्याबरोबरच परीक्षेची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पुढील वर्षापासून NEET परीक्षा संगणकावर आधारित होण्याची शक्यता असून, पेपर माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आणि परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. "मी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणाशी संबंधित सर्वांना सांगू इच्छितो की, पुढील वर्षीची NEET परीक्षा संगणकावर आधारित असण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आतापासूनच त्याची तयारी सुरू करावी," असे आवाहनही त्यांनी केले.

पेपर माफियांवर कठोर कारवाई

नीट परीक्षा पद्धत मजबूत करण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "आमी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करू. भीती निर्माण करणाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि सिस्टीममध्ये माफिया सक्रिय राहणार नाहीत याची खात्री करू. NEET आणि UGC-NET सारख्या परीक्षा जास्तीत जास्त त्रुटीमुक्त करणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे त्यांनी पुढे सांगितले.

जंतरमंतरवरील आंदोलनांमागील हेतू संशयास्पद

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधान सुरू असलेल्या आंदोलनांबाबत विचारले असता प्रधान म्हणाले की, प्रत्येकाला आंदोलनाचा लोकशाही अधिकार आहे, परंतु काही आंदोलनांमागील हेतू संशयास्पद आहे. "देशाचे तुकडे करू पाहणारेच आज जंतरमंतरवर डफली वाजवत आहेत. तिथे एकतरी विद्यार्थी आहे का? काही लोक विद्यार्थ्यांच्या नावाने तिथे जमतात. आमचा त्याला विरोध नाही, संविधानाने त्यांना तो अधिकार दिला आहे. पण देशही याचे मूल्यमापन करत आहे," असे ते म्हणाले.

विद्यार्थी तुमचे ऐकत नाहीत

राहुल गांधी आणि CJP च्या आंदोलनाचा संदर्भ देत प्रधान म्हणाले की, "तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करायचा होता, पण त्यात तुम्ही यशस्वी झाला नाहीत. ही तर दहशतवाद्यांची बी-टीम आहे. विद्यार्थी तुमचे ऐकत नाहीत, ते परीक्षा केंद्रांवर बसून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT