SpiceJet DGCA Notice: स्पाइसजेट एअरलाइनच्या अडचणी वाढल्या आहेत. विमान वाहतूक क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सातत्याने विमानांची उड्डाणे रद्द होणे, उड्डाणांना होणारा उशीर आणि नियमांचे पालन न केल्याने DGCAने कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या कामात सातत्याने अडचणी येत आहेत. अनेक उड्डाणे वेळेवर होत नसल्याने आणि अचानक रद्द केली जात असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय कंपनीची अनेक विमाने अद्याप सेवेत दाखल झालेली नाहीत. ही विमाने पुन्हा सेवेत आणण्यासाठी कंपनीकडे ठोस योजना नसल्याचेही DGCAने नमूद केले आहे.
१७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये DGCAने स्पाइसजेटच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कंपनीने ठरलेल्या वेळापत्रकानुसार विमानांची उड्डाणे केली नसल्याचे आढळून आले आहे.
विमानांना होणारा विलंब, अचानक रद्द होणारी उड्डाणे आणि इतर अडथळ्यांमुळे प्रवाशांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना आवश्यक मदत देण्यासाठीही कंपनीने योग्य व्यवस्था केलेली नसल्याचे DGCAने म्हटले आहे.
नोटिसमध्ये स्पाइसजेटच्या मोठ्या संख्येने विमानांचा वापर होत नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. ही विमाने पुन्हा सेवेत आणण्यासाठी कंपनीची कोणतीही योजना नाही. त्यामुळे कंपनीने नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत आपले स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
स्पाइसजेटच्या विमानांना होणारा विलंब आणि अचानक रद्द होणाऱ्या उड्डाणांमुळे प्रवाशांचा संताप वाढत आहे. संयम गंगवाल नावाच्या प्रवाशाने सोशल मीडियावर आपला अनुभव सांगितला आहे.
त्याने मुंबईहून फुकेतला जाणारे स्पाइसजेटचे विमान रद्द झाल्याची माहिती दिली. या प्रकारामुळे त्याची संपूर्ण आंतरराष्ट्रीय ट्रिप अडचणीत आली. हॉटेल आणि इतर बुकिंगसाठी त्याने आधीच पैसे भरले होते. मात्र, विमान रद्द झाल्यानंतर स्पाइसजेटकडून योग्य मदत मिळाली नाही.
यावर स्पाइसजेटने सोशल मीडियावर उत्तर देताना वेळापत्रकातील बदलांमुळे SG-81 हे विमान रद्द करण्यात आल्याचे सांगितले. काही आवश्यक कारणांमुळे विमानांना विलंब होऊ शकतो किंवा उड्डाणे रद्द करावी लागू शकतात, असेही कंपनीने स्पष्ट केले.
कुशाग्र देव नावाच्या प्रवाशानेही स्पाइसजेटच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याला दरभंगा येथून दिल्लीला जाण्यासाठी स्पाइसजेटच्या SG-2496 या विमानाने प्रवास करायचा होता.
मात्र, तो विमानतळावर पोहोचल्यानंतर शेवटच्या क्षणी विमान रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे, त्यानंतर प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही किंवा कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप त्याने केला आहे.
आशुतोष कुमार नावाच्या दुसऱ्या प्रवाशानेही विमानाच्या विलंबाबाबत अनुभव शेअर केला. १३ नोव्हेंबर रोजी दिल्लीहून पाटण्याला जाणारे SG-709 हे विमान सहा ते सात तास उशिराने निघाले. मात्र, या विलंबाबाबत माहिती देण्यासाठी स्पाइसजेटचा कोणताही कर्मचारी गेटवर उपस्थित नव्हता, असे त्याने सांगितले.
दिलीप नावाच्या एका प्रवाशानेही स्पाइसजेटच्या सेवेबाबत तक्रार केली आहे. मुंबईहून दिल्लीला जाणारे SG-670 हे विमान रद्द झाल्याचे दिसत होते. मात्र, याबाबत स्पाइसजेट किंवा यात्रा ऑनलाइनकडून कोणताही मेसेज किंवा उत्तर मिळाले नसल्याचे त्याने सांगितले.
आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला जायचे असल्याने तातडीने दुसऱ्या विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्याने स्पाइसजेट, विमानतळ प्राधिकरण आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली.