दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापिका देवस्मिता पॉल यांच्‍या हत्‍येचे गूढ पोलीसांनी तीन दिवसात उकलले आहे. Pudhari
राष्ट्रीय

Crime news | तब्बल १,४०० किलोमीटरचा प्रवास...पाठीवर बॅग अन् सोबत लहान मूल! प्राध्यापिकेच्या हत्येचे गूढ पोलिसांनी कसं उकललं?

दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिकेच्या हत्या प्रकरणी पश्चिम बंगालमधून दाम्पत्याला अटक

पुढारी वृत्तसेवा

Delhi University professor murder : दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिकेच्या हत्येचे गूढ पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उकलले आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालमधून एका दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून या प्राध्यापिकेची हत्या करण्यासाठी आरोपींनी बंगालमधून तब्बल १,४०० किलोमीटरचा प्रवास करून दिल्ली गाठली होती.

बहिणीला आढळला होता मृतदेह

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून कार्यरत असलेल्या देवस्मिता पॉल यांची बुधवारी पूर्व दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेवमधील 'सत्यम अपार्टमेंट्स' या त्यांच्याच फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली होती. गुरुवार, ४ जून रोजी देवस्मिता यांची बहीण देवरातीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, देवस्मिता यांच्या फ्लॅटला बाहेरून कुलूप होते. देवस्मिता फोन उचलत नसल्याने देवरातीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत देवस्मिता यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि हाताच्या नसा कापलेल्या होत्या.

पॉल फ्‍लॅटमध्‍ये एकट्याच राहत होत्‍या

देवस्मिता यांचा विवाह २०१७ मध्ये झाला होता; परंतु २०२२ मध्ये त्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. पती बेंगळुरू येथे राहत होता, तर देवस्मिता दिल्लीतील फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.

तोंडाला मास्क.. लिफ्टचा वापर टाळला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी वर्धमान येथील रहिवासी आहेत. प्राध्यापिका देवस्मिता पॉल यांना भेटण्याच्या बहाण्याने ते दिल्लीत आले. बुधवारी दाम्‍पत्‍य तोंडाला मास्क लावून देवस्मिता यांच्या फ्लॅटवर आले होते. ते सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले. ते एका खाजगी कॅबने आले होते आणि त्यांच्याकडे काही बॅगा होत्या. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांनी सहावा मजला गाठला. संशय टाळण्यासाठी त्यांनी आपल्या लहान मुलालाही सोबत आणले होते. देवस्मिता यांनी ओळखीचे असल्याने त्यांना घरात घेतले. त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या शस्त्राने देवस्मिता यांची हत्या केली.

कॅब चालकाला ताब्यात घेत पोलिसांनी दाम्पत्याचा माग काढला

हत्या केल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत आरोपींनी आपले कपडे बदलले आणि खाली थांबलेल्या कॅबमधून ते पसार झाले. पोलिसांनी तात्काळ त्या कॅब चालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्या कॅबच्या प्रवासाचा तपशील मिळवून प्रवाशांची ओळख पटवली. बुधवारी त्या गृहनिर्माण सोसायटीला भेट देणाऱ्या सुमारे २०० लोकांपैकी १३ संशयितांची यादी पोलिसांनी तयार केली आणि त्यांची चौकशी केली. पोलिसांनी ७ पथकांनी चार राज्यांमध्ये छापे टाकून शेकडो लोकांकडे चौकशी केली. या चक्रव्यूहामुळे पोलिसांनींना या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले. अखेर आरोपींना वर्धमानमधून अटक करण्यात आली असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

खुनामागील कारण काय?

मृत देवस्मिता पॉल यांच्या नावावर पश्चिम बंगालमध्ये मालमत्ता होती. ही मालमत्ता त्यांना आजोबांच्या निधनानंतर वारसा हक्काने मिळाली होती. या मालमत्तेची किंमत कोट्यवधी रुपये आहे. अटक करण्यात आलेले दाम्पत्य त्याच घरात भाडेकरू म्हणून राहत होते. ती मालमत्ता हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, देवस्मिता त्यांच्यावर घर खाली करण्यासाठी दबाव टाकत होत्या. याच रागातून भाडेकरू दाम्पत्याने मालमत्ता लाटण्यासाठी देवस्मिता यांच्या हत्येचा कट रचला, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. घरातून दागिने आणि रोकड चोरीला गेली नसल्याने ही चोरीच्या उद्देशाने केलेली हत्या नसल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट झाले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास केला. अवघ्या ७२ तासांत आरोपींना गजाआड केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT