Delhi Triple Murder Case Updates Pudhari
राष्ट्रीय

Triple Murder Case: पैशाचा पाऊस पाडतो... तिहेरी हत्याकांडांचा रक्तरंजित कट; तांत्रिकाने विषारी लाडू देऊन केली हत्या

Delhi Triple Murder Case: दिल्लीतील पीरागढी परिसरात कारमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी स्वयंघोषित तांत्रिक कमरुद्दीनला अटक करण्यात आली आहे. “धनवर्षा होईल” असं आमिष दाखवून त्याने तिघांना विषारी लाडू दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

Rahul Shelke

Delhi Triple Murder Case: दिल्लीतील पीरागढी परिसरात कारमध्ये तीन मृतदेह सापडल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मात्र पोलिस तपासात हा अपघात नसून कट असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणात 72 वर्षीय स्वयंघोषित तांत्रिक कमरुद्दीनला अटक करण्यात आली आहे.

कारमध्ये आढळले तीन मृतदेह

8 फेब्रुवारी रोजी पश्चिम विहार ईस्ट भागात पीरागढी उड्डाणपुलाजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये रणधीर (76), शिव नरेश (42) आणि लक्ष्मी (40) यांचे मृतदेह आढळले. रणधीर चालकाच्या सीटवर, तर मागील सीटवर शिव नरेश आणि लक्ष्मी होते. कारमध्ये दारूच्या बाटल्या, रिकामे ग्लास, मोबाईल फोन आणि काही वस्तू सापडल्या. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र कुटुंबीयांनी तो फेटाळून लावत ही घातपाताची घटना असल्याचा दावा केला.

तंत्र-मंत्र करून पैसा मिळवून देतो असा दावा

पोलिस तपासात समोर आलं की तिघेही कमरुद्दीनच्या संपर्कात होते. तो स्वतःला गूढ शक्ती असलेला तांत्रिक असल्याचं सांगत असे. “विशेष विधी केल्यास अचानक मोठा पैसा मिळू शकतो”, असं सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करायचा.

याच आमिषाखाली त्याने तिघांना दोन लाख रुपये आणायला सांगितले. पीरागढीकडे जात असताना त्याने त्यांना विष असलेले लाडू खायला दिले, असा पोलिसांचा संशय आहे. प्रकृती बिघडू लागल्यावर त्याने कार थांबवायला सांगितली, खाली उतरून पैसे घेऊन पळ काढला. काही वेळातच तिघांचा मृत्यू झाला.

आधीही अशाच पद्धतीने केल्या हत्या

ही पहिलीच वेळ नाही. कमरुद्दीनचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे त्याच्यावर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्या वेळीही त्याने दोन जणांना “जमिनीत गाडलेला खजिना काढून देतो” असं सांगून आपल्या घरी बोलावलं आणि विष दिल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह त्यांच्या घरी आढळले होते.

याआधी 2014 मध्ये राजस्थानमध्ये एका महिलेच्या हत्येप्रकरणातही त्याचं नाव पुढे आलं होतं. पोलिसांना संशय आहे की अशाच प्रकारे त्याने आणखी काही लोकांना बळी घेतला असावा.

चमत्कारांचा खेळ

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कमरुद्दीन लोकांसमोर शाल पसरून “जादूने पैसे प्रकट होत आहेत” असा देखावा करायचा. या बनावट चमत्कारांमुळे लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कार्डवर “सर्व प्रकारच्या समस्या आणि आजारांवर उपाय” अशी जाहिरात छापलेली होती. लोकांच्या अडचणी, आजार आणि अचानक श्रीमंत होण्याची इच्छा याचा तो पुरेपूर फायदा घेत असे.

‘मॅरिज होम’चा मालक, पण प्रत्यक्षात तांत्रिक

कमरुद्दीन उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे ‘बिस्मिल्ला मॅरिज होम’ चालवत असल्याचं सांगितलं जातं. मात्र तो बहुतेक वेळा दिल्ली परिसरात राहून तंत्र-मंत्र आणि तथाकथित तांत्रिक उपचार करत होता. लोनी (गाझियाबाद) परिसरात तो गेली अनेक वर्षे राहत होता.

पोलिसांचा तपास

सध्या कमरुद्दीनवर खून आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस त्याचा संपूर्ण गुन्हेगारी इतिहास तपासत आहेत. आणखी किती लोकांना त्याने अशाच प्रकारे फसवलं, कुठे-कुठे त्याचे संपर्क आहेत आणि या जाळ्यात अजून कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT