Delhi Red Fort Terror Threat Pudhari
राष्ट्रीय

Delhi Red Fort Terror Threat: दिल्लीतील लाल किल्ला-चांदणी चौक भागावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

‘लष्कर-ए-तोयबा’कडून मंदिरांना लक्ष्य करण्याची शक्यता; गुप्तचर इशाऱ्यानंतर राजधानीत सुरक्षा कडक

पुढारी वृत्तसेवा

‌‘लष्कर-ए-तोयबा‌’कडून दिल्लीतील लाल किल्ला आणि चांदणी चौक भागातील धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा कट.

चांदणी चौकातील एक मंदिर विशेष लक्ष्य; इस्लामाबाद मशिदीतील स्फोटाचा बदला घेण्याचा हेतू.

6 फेब्रुवारी 2026 च्या इस्लामाबाद हल्ल्यात 32 मृत्यू; एलईटीने भारतातील प्रमुख मंदिरांना टार्गेट केले.

दिल्लीत सुरक्षा कडक; सीसीटीव्ही, वाहन तपासणी, अतिरिक्त जवान आणि बॉम्ब स्क्वॉड सज्ज; जनतेने सतर्क राहावे.

नवी दिल्ली : दिल्लीत लाल किल्ला, चांदणी चौक आणि आसपासच्या प्रमुख धार्मिक व वारसास्थळांवर दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‌‘लष्कर-ए-तोयबा‌’ने कट आखला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती आली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. पाकिस्तानात अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटांना भारत जबाबदार असल्याचा आरोप त्या देशाने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याशी संधान साधून हा कट रचण्यात आल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाकडून (एलईटी) भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांवर हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः चांदणी चौक भागातील एका मंदिराला लक्ष्य बनवण्याची माहिती मिळाली आहे.

इस्लामाबादमधील मशिदीतील स्फोटाशी संबंध

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलईटीच्या माध्यमातून हा दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाक सैन्य प्रयत्न करू शकते. ही कारवाई पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे 6 फेब्रुवारी 2026 रोजी एका शिया मशिदीवर झालेल्या स्फोटाशी जोडली गेली आहे. त्या हल्ल्यात 32 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 170 हून अधिक जखमी झाले. दहशतवादी संघटनेने या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतातील धार्मिक स्थळांना लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे. मात्र, ही माहिती पूर्णपणे तपासली जात आहे.

सुरक्षा उपायांमध्ये वाढ; सतर्क राहण्याचे आवाहन

या कटाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्यात आला आहे. सीसीटीव्ही निरीक्षण वाढवण्यात आले आहे, वाहन तपासणी वाढवली आहे. अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड, डॉग स्क्वॉड आणि क्विक रिॲक्शन टीम्सना सज्ज ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही उपाययोजना सावधगिरीची आहे. घाबरण्याची गरज नाही. मात्र, संशयास्पद वस्तू किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोव्हेंबरमधील स्फोटाची आठवण

हा कट रचल्याचे स्पष्ट होताच 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटाची आठवण करून देते. त्या हल्ल्यात 13 लोकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जखमी झाले. हा स्फोट रेड फोर्ट मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झाला होता. त्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून आता नवीन कटामुळे पुन्हा एकदा सावधगिरी वाढवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT