

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात एआयच्या साहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर ही बाब केवळ प्रदर्शन आणि चर्चेपुरती मर्यादित न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मधील ‘एआय इन ॲग्रिकल्चर’ या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था, गुंतवणूकदार यांना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तयार आहे. जगातील अनेक देशांसाठी कृषी विषय केवळ आर्थिक विषयाशी निगडित नाही. कृषी विषय अन्न सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. यामुळे भारताने याबाबत फार पूर्वीच विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या इंडिया एआय मिशनमध्ये कृषी क्षेत्राचा प्रामुख्याने विचार केला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, सेवापुरवठा, समावेशकता यांचा विचार केला गेला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, एआय जादूची कांडी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. एआय मॉडेल विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकांशी असलेले उत्तरदायित्व यावर आधारित असायला हवे. विश्वासाशिवाय शेतीशी निगडित
विविध सेवा आपण देऊ शकणार नाही. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, ज्याने एआय ॲग्रीकल्चरसाठी 500 कोटींचा निधी दिला आहे. महाराष्ट्र राज्य स्वतःचे एआय मॉडेल तयार करणार असून ओपन एआय, सर्वम एआय आणि आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार केले आहेत. चॅट जीपीटीप्रमाणे हे मॉडेल तयार करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. पुढच्या काळात आपले राज्य एआय रेडी राज्य असेल, असेही ते यावेळी म्हणाले. या चर्चासत्रात राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार अगरवाल, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदी, कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष जोहॅन्स झुट, एकस्टेप फाऊंडेशनचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मरुवाडा मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती.
देवेश चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राचे एआय क्षेत्रातील योगदानासाठी आणि टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी कौतुक केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या क्षेत्रासाठीचा पुढाकार आणि विशेषतः कृषी विभागाने राबविलेल्या फार्मर आयडी आणि डिजिटल क्रॉप सर्व्हेसाठी त्यांनी कौतुकोद्गार काढले. महाराष्ट्राने भारत विस्तारमध्ये महाविस्तार प्लॅटफॉर्मद्वारे एआय आधारित सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. भारत विस्तारमध्ये शेतकऱ्यांना हवामान, बियाण्यांपासून पिकांची काळजी, खते, सिंचन ते बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता इंग्रजी आणि हिंदी भाषेतही पुढे जाऊन सर्व भाषांमधून मार्गदर्शन, माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. सौम्या स्वामिनाथन यांनी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सजगता यावी यावर भर दिला. तंत्रज्ञानाच्या अंगाने, कृषी क्षेत्रातील बदलाच्या परिस्थितीत स्त्रियांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा विसर पडता कामा नये. तंत्रज्ञान हे चांगले किंवा वाईट नसते. ते कसे वापरले जाते, यावर त्याचे यश अवलंबून असते.
सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षिततेवर ताण आला आहे. अनिश्चित वातावरण, घसरणारी पाणी पातळी, जमिनीचा खालावणारा दर्जा, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता यांचा या आव्हानांमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत एआय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राज्यसभेच्या सातपैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी सातवी जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची हा निर्णय ते करतील, असे सूचक विधानही फडणवीस यांनी केले आहे. राजधानी नवी दिल्लीत ‘एआय समिट’नंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकांवर भाष्य केले. महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असून सातपैकी सहा उमेदवारांचा विजय पक्का आहे. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. मात्र ती जागा कोणाला द्यायची हे त्यांनी ठरवायचे आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राज्यसभा निवडणुकांसाठीच्या राजकीय समीकरणांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मागील काही निवडणुकांचा इतिहास पाहता संख्याबळ नसतानाही भाजपने अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्याची किमया केली आहे.