Delhi crime news
नवी दिल्ली : पत्नीने २० रूपये दिले नाही म्हणून पतीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. पूर्व दिल्लीतील शाहदरा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलवंत सिंग हा त्याची पत्नी महेंद्र कौर हिच्यासोबत शाहदरा येथील कस्तुरबा नगरमध्ये राहत होता. बुधवारी सकाळी दोघांमध्ये अत्यंत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. कुलवंत आपल्या पत्नीकडे २० रुपये मागत होता, पण तिने देण्यास नकार दिला. यामुळे कुलवंतचा पारा चढला. त्याने घराच्या छतावर महेंद्र हिचा गळा आवळला आणि त्यानंतर तिचा मृतदेह घराच्या आत नेला.
बुधवारी दुपारी त्याच्या भावाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिला चादरमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत होती. महेंद्र हिचा मुलगा शिवचरण याने सुरुवातीला आईने आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना तिच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या आणि संशय बळावला. शवविच्छेदनातही गळा आवळल्यामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान कुलवंत घरातून गायब असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी कुलवंतचा शोध सुरू केला. जेव्हा पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा तो रेल्वे रुळावर बसलेला होता. पोलिसांना पाहताच त्याने रुळावरून पळायला सुरुवात केली. अटकेच्या भीतीने त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्या दोघांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.