Pudhari
राष्ट्रीय

High Court : "एकदा योगायोग, पण तीनदा...": जेम्स बाँडचा 'तो' डायलॉग अन् न्यायमूर्तींकडून हायकोर्टात वकिलाची 'झाडाझडती'!

कंपनीविरोधातील एकतर्फी स्थगिती आदेश तत्काळ रद्द, २ लाखांचा दंडही ठोठावला

पुढारी वृत्तसेवा

Delhi High Court James Bond quote Lawyer

ट्रेडमार्क संदर्भातील खटल्यांमध्ये महत्त्वाचे पुरावे व तथ्ये वारंवार लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वकिलाच्या कार्यपद्धतीवर दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र ताशेरे ओढले. न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती मनमीत प्रितम सिंग अरोरा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी इयान फ्लेमिंग यांच्या प्रसिद्ध 'जेम्स बाँड' कादंबरी 'गोल्डफिंगर'मधील एका वाक्याचा संदर्भ देत वकिलाला कठोर शब्दांत फटकारले.

महत्त्वाची माहिती न्यायालयापासून लपवली

'बार अँड बेंच'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'न्यूजेनेसिस फार्मास्युटिकल्स' आणि त्यांचे मालक शोएब मंडलेकर यांनी 'सेलॅजेनेक्स रिसर्च' या कंपनीविरुद्ध न्यायालयात अर्ज केला होता. 'सेलॅजेनेक्स' या कंपनीने न्यायालयाकडून न्यूजेनेसिसच्या 'RewireX' या ब्रँड (ट्रेडमार्क) वापरावर तात्पुरती बंदी आणली होती. हे करताना सेलॅजेनेक्सने न्यायालयात सांगितले की, "आम्हाला या ब्रँडबद्दल मे २०२६ मध्येच माहिती मिळाली." पण न्यायालयाच्या निदर्शनास आले की, सेलॅजेनेक्सने ऑक्टोबर २०२५ मध्येच न्यूजेनेसिसला नोटीस पाठवली होती. जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी न्यूजेनेसिसच्या अर्जाला विरोधही दर्शवला होता. सेलॅजेनेक्स कंपनीला या ब्रँडबद्दल आधीपासूनच कल्पना होती, तरीही त्यांनी ही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे न्यायालयापासून लपवून ठेवून स्थगिती मिळवली होती. याविरोधात याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती मनमीत प्रितम सिंग अरोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

वकिलांकडून न्यायालयाची पद्धतशीर दिशाभूल

या प्रकरणी संबंधित वकील सचिन गुप्ता यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या ट्रेडमार्क खटल्यांचा संदर्भ खंडपीठाने दिला. अंतरिम आदेश मिळवण्यासाठी न्यायालयात तथ्ये लपवण्याची ही पद्धतशीर चाल बनली आहे. यापूर्वीच्या खटल्यांमध्ये कोर्टाने दाखवलेल्या सहानुभूतीचा गैरफायदा घेतला गेला आहे, असे सांगत खंडपीठाने अशा प्रकारावर चिंता व्यक्त केली.

"एकदा योगायोग, पण तीनदा..."

खंडपीठाने या प्रकरणी इयान फ्लेमिंग यांच्या प्रसिद्ध 'जेम्स बाँड' कादंबरी 'गोल्डफिंगर'मधील एका वाक्याचा संदर्भ देत टिप्पणी केली की, “पहिल्यांदा घडलेली गोष्ट ही अपघाती असू शकते, दुसऱ्यांदा ती योगायोग असू शकते; पण तिसऱ्यांदा ती शत्रूची कृती (हेतूपुरस्सर केलेले कृत्य) असते. एखादी गोष्ट वारंवार घडत असेल तर ती सहज घडलेली नसून, तो ठरवून केलेला कट असतो,” अशा शब्दांमध्ये वकिलांना फटकारले.

एकतर्फी स्थगिती आदेश तत्काळ रद्द, २ लाखांचा दंडही ठोठावला

सेलॅजेनेक्स कंपनीला दिलेला एकतर्फी स्थगिती आदेश न्यायालयाने तत्काळ रद्द केला. तसेच सेलॅजेनेक्सचा अंतरिम दिलाशाचा अर्ज फेटाळत कंपनीवर २ लाख रुपयांचा दंड ठोठावला. जप्त करण्यात आलेला न्यूजेनेसिस कंपनीचा माल तातडीने सोडण्याचे आदेश दिले. न्यायालयाने स्पष्ट केले की, 'स्टेटमेंट ऑफ ट्रुथ' (सत्यप्रतिज्ञापत्र) वर स्वाक्षरी केल्यामुळे या संपूर्ण गैरप्रकारात वकील गुप्ता यांच्यासोबतच सेलॅजेनेक्स कंपनीसुद्धा तितकीच जबाबदार असल्याचेही खंडपीठाने सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT