Delhi HC verdict  Pudhari
राष्ट्रीय

Delhi HC verdict : भांडणावेळी 'मारो साले को' म्हणणं म्हणजे हत्येचा हेतू नव्हे: हायकोर्ट

जन्‍मठेपेच्‍या शिक्षेविरोधात आरोपीने घेतली होती उच्‍च न्‍यायालयात धाव

पुढारी वृत्तसेवा

Delhi HC verdict : डीटीसी (DTC) बसमध्ये झालेल्या भांडणादरम्यान "मारो साले को" असे ओरडल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीची दिल्ली उच्च न्यायालयाने खून खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ 'मारो साले को' हे वाक्य हत्येचा सामूहिक हेतू सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

काय घडलं होतं?

१ डिसेंबर १९८३ रोजी रूट नंबर ४३१ च्या दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (DTC) बसमध्ये काही तरुणांनी दोन महिला प्रवाशांशी छेडछाड केली. विनोद कुमार आणि त्यांच्या मित्रांनी याला विरोध केला, तेव्हा बसमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. या वादादरम्यान, सह-आरोपी बलविंदर सिंग याने विनोद यांच्यावर चाकूने वार केले. तो गंभीर जखमी झाला. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. तर बसच्या मागील बाजूस उभा असलेला दुसरा आरोपी मुकेश कुमार याने "मारो साले को" असे ओरडून इतरांना चिथावणी दिल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता.

जन्‍मठेपेच्‍या शिक्षेविरोधात आरोपींची उच्‍च न्‍यायालयात धाव

तपास सुरू झाल्यावर मुकेश कुमारसह चार जणांना अटक करण्यात आली होती. साक्षीदारांनी आपल्याला आधीच पाहिले असल्याचा दावा करत त्यांनी ओळख परेडमध्ये (TIP) भाग घेण्यास नकार दिला होता. यानंतर आरोपींवर भादंवि (IPC) कलम ३०२ (खून), ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३४ (समान हेतू) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.ऑगस्ट २००४ मध्ये, दिल्लीच्या सत्र न्यायालयाने मुकेश आणि इतर दोघांना हत्येच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात मुकेशने उच्च न्यायालयात अपील केले होते. हा खटला गेल्या २२ वर्षांपासून दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित होता.

आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी

मुकेशच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मुख्य आरोपीसोबत मुकेशचा हत्येचा कोणताही समान हेतू होता हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे. तसेच साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतींवरही त्यांनी बोट ठेवले.उच्च न्यायालयाला या युक्तिवादात तथ्य आढळले. न्यायालयाने नमूद केले की, मुकेशकडे कोणतेही हत्यार नव्हते आणि त्याने कोणावरही थेट हल्ला केला नव्हता. त्याच्यावर केवळ "मारो साले को" असे ओरडल्याचा आरोप होता.

मारो या शब्‍दाचा अर्थ मारहाण असू शकतो, जीवे मारणे नव्‍हे

न्यायमूर्ती नवीन चावला आणि न्यायमूर्ती रवींद्र दुडेजा यांच्या खंडपीठाने मुकेश कुमार या आरोपीला संशयाचा फायदा दिला. "मारो" या शब्दाचा अर्थ मारहाण करणे असा असू शकतो, प्रत्येक वेळी जीव मारणे असाच त्याचा अर्थ असतो असे नाही. "केवळ ‘मारो साले को’ या शब्दांचा वापर हत्येचा हेतू दर्शवत नाही; तर तो दुखापत करण्याच्या हेतूने देखील वापरला जाऊ शकतो," असे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले. तसेच मुकेशला सह-आरोपींकडे चाकू आहे याची कल्पना होती किंवा त्यांचा आधीच काही कट होता, असा कोणताही पुरावा नसल्‍याचे स्‍पष्‍ट करत न्यायालयाने मुकेश कुमारची सर्व आरोपातून मुक्तता केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT