Delhi Red Fort Blast:
नवी दिल्ली : सोमवारी संध्याकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर झालेला कार स्फोट हा फरिदाबाद येथील दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य डॉ. मोहम्मद उमर याने केलेला दहशतवादी हल्ला असावा, असा संशय असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, पाकिस्तानच्या गूगल ट्रेंडमध्येही लोक या स्फोटाशी संबंधित माहिती वेगाने शोधत आहेत.
फरिदाबाद मॉड्यूलचा मुख्य आरोपी असलेल्या त्याच्या साथीदार डॉ. मुझम्मिल शकीलला अटक केल्यानंतर उमर घाबरला असावा असे मानले जाते. सूत्रांनी सांगितले की उमरने लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ स्फोटकांनी भरलेल्या हुंदाई आय२० मध्ये जाणूनबुजून स्फोट घडवून आणला असावा. तपासात असेही समोर आले की स्फोट झालेली कार घटनेपूर्वी सुमारे तीन तास सुनेहरी मशिदीजवळ उभी होती.
एकीकडे भारत या घटनेमुळे हादरला असताना, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये या स्फोटाची जोरदार चर्चा आहे. पाकिस्तानच्या गुगल ट्रेंड मध्ये या घटनेशी संबंधित माहिती वेगाने शोधली जात आहे. पाकिस्तानी युजर्स प्रामुख्याने 'स्फोट कसा झाला', 'नुकसान किती झाले' आणि 'तपास कोणत्या दिशेने सुरू आहे' हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
याशिवाय, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पाकिस्तानच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये दिल्ली दुसऱ्या स्थानावर आले आहे. लोक या घटनेचे अपडेट्स आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने लाल किल्ला मेट्रो स्टेशन तात्पुरते बंद करण्यात आले असून, गेट क्रमांक 1 आणि 4 सील करण्यात आले आहेत.