Delhi Assembly security breach
दिल्ली विधानसभेत सोमवारी सुरक्षेचा भंग झाल्याची घटना समोर आली आहे. एक अज्ञात कार गेट तोडून परिसरात घुसली आणि त्यानंतर तिथून पसार झाली. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत आहेत, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारने दिल्ली विधानसभेच्या आवारात घुसखोरी केली. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने बॅरिकेड्स तोडून आवारात जबरदस्तीने प्रवेश केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विधानसभेत प्रवेश केल्यानंतर, कार थोड्या वेळासाठी आत गेली आणि नंतर बाहेर पडून घटनास्थळावरून दिसेनाशी झाली. या धक्कादायक प्रकारामुळे दिल्ली राज्य विधानमंडळातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक बेदरकारपणे भरधाव वेगाने विधानस परिसरात आला. त्याने गेट क्रमांक २ बाहेर लावलेल्या सुरक्षा बॅरिकेड्सना धडक दिली आणि मुख्य प्रवेशद्वार तोडले. या अचानक झालेल्या घुसखोरीमुळे घटनास्थळी घबराट पसरली आणि सुरक्षा कर्मचारी तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी धावून गेले. ही कार उत्तर प्रदेश नोंदणी क्रमांक असलेली होती. कार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विधानसभेच्या आवारात घुसली, असे त्यांनी सांगितले.
भरधाव वेगाले आलेला कारचालक विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाकडे गेला आणि मागे फिरण्यापूर्वी त्याने पोर्चजवळ फुलांचा गुच्छ ठेवला," असे दिल्ली सचिवालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आवारात प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून पोलीस पथकांनी कारचा शोध घेण्यासाठी आणि चालकाची ओळख पटवण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कार चालकासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. उत्तर जिल्हा पोलीस पथकाने रूपनगर परिसरातील एका तपासणी नाक्यावर ही कार जप्त केली. सरबजीत नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सरबजीत हा उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील रहिवासी आहे.
दिल्ली पोलिसांनी वाहनाचा माग काढण्यासाठी आणि चालकाची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल तपास सुरू केला आहे. प्रशासन प्रवेशमार्गांचा आढावा घेत असून, घुसखोरीच्या वेळी उपस्थित असलेल्या विधानसभा कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहे.या घटनेमुळे विधानसभेच्या सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या असून, अधिक कडक देखरेख आणि वाढीव तपासणीची मागणी होत आहे.