Delhi Agra Expressway Accident file photo
राष्ट्रीय

Delhi Agra Expressway Accident: यमुना एक्स्प्रेसवेवर मोठी दुर्घटना! 11 वाहने धडकली, 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 25 जखमी!

मथुरा येथे आज पाहाटे यमुना एक्सप्रेसवेवर आग्रा ते नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या 8 बस आणि 3 कार दाट धुक्यामुळे एकमेकांना धडकल्या.

मोहन कारंडे

Delhi Agra Expressway Accident

नवी दिल्ली : मथुरा येथे आज पाहाटे यमुना एक्सप्रेसवेवर आग्रा ते नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या 8 बस आणि 3 कार दाट धुक्यामुळे एकमेकांना धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की सर्व वाहनांमध्ये भीषण आग लागली. यात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना आग्रा ते नोएडा मार्गावर बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेहरा गावाजवळ माईल स्टोन 127 जवळ घडली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहोचवले जात आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर बसमधील प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी अन्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, 8 बस आणि 3 लहान कार एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे अनेक प्रवासी वाहनांमध्येच अडकले. तर काही प्रवाशांनी खाली उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, आत अडकलेल्या प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली. अपघातानंतर बसमधून उडी मारून बचावलेल्या कानपूरच्या सौरभने सांगितले की, धुके खूप दाट होते आणि काहीही दिसत नव्हते. त्यामुळे बस एकमेकांवर आदळल्या. अपघात झाल्यावर वाहनांना आग लागली

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, अपघातात बस आणि गाड्यांची टक्कर झाली. यामुळे आग लागली, ज्यात 4 लोकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घेतली आहे आणि जखमींवर उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांना 2 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देशही दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT